Maharashtra Water Crisis : राज्यात २५ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई.! विरोधी आमदारांचा पाणीटंचाईबाबतचा दावा अंशतः खरा
काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी व्यापक पाणीटंचाईबाबत केलेले दावे अंशतः खरे होते आणि या वर्षी २२ जूनपर्यंत १,२०० हून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.

Maharashtra Water Crisis : काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी व्यापक पाणीटंचाईबाबत केलेले दावे अंशतः खरे होते आणि या वर्षी २२ जूनपर्यंत १,२०० हून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, अशी कबूली राज्य सरकारने बुधवारी विधानसभेत दिली. अमित देशमुख यांनी उपस्थित केलेल्या एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना पेयजल व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली.
देशमुख यांनी दावा केला होता की, सरकारी आकडेवारी दर्शवते त्यापेक्षा पाणीटंचाईची समस्या अधिक व्यापक आहे. मंत्र्यांनी हा दावा अंशतः खरा असल्याचे सांगितले. अहवालानुसार, राज्यातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या होती. यात १,२७९ गावे आणि ३,३८९ वाड्यांना १,४१३ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात होते.
विशेष म्हणजे, यावेळी मान्सूनचे आगमन उशिरा झाले होते, परंतु जुलैच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. पेयजल व स्वच्छता विभागाच्या साप्ताहिक अहवालात केवळ २,२८५ गावेच टंचाईग्रस्त असल्याचे का दाखवले जात होते?, तर प्रत्यक्षात ही संख्या ८,००० ते ९,००० च्या दरम्यान होती, अशी विचारणा देशमुख यांनी केली होती.
मंत्री पाटील यांनी सांगितले की, पाणीटंचाईने बाधित झालेल्या १२,४०६ गावे आणि वाड्यांमध्ये सरकारने अनेक उपाययोजना केल्या. यामध्ये खाजगी विहिरींचा वापर करणे, पाणीपुरवठा योजना व नळांची दुरुस्ती करणे आणि पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी इतर आपत्कालीन व्यवस्था राबवणे यांचा समावेश होता.
तसेच, धरणांचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही सरकारने दिले होते, असे पाटील म्हणाले.





