Maharashtra Wage Rules 2026 : महाराष्ट्रात पगाराबाबत नवीन नियम लागू; कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा
Maharashtra Wage Rules 2026 : महाराष्ट्र सरकारने कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे नवे नियम अधिसूचित केले आहेत.

Maharashtra Wage Rules 2026 : महाराष्ट्र सरकारने कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात महत्त्वाचे नवे नियम अधिसूचित केले आहेत. ‘महाराष्ट्र वेतन नियम, २०२६’ हे नियम ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून राज्यभर लागू झाले आहेत. (Maharashtra Wage Rules 2026)
या नियमांनुसार, संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास, साप्ताहिक विश्रांती, अतिकालिक वेतन, वेतन कपात आणि नोंदी ठेवण्याबाबत स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र, हे नियम वेतन संहिता, २०१९ च्या कक्षेत येणाऱ्या आस्थापनांतील कर्मचाऱ्यांसाठी आहेत; सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट लागू होत नाहीत. (Maharashtra Wage Rules 2026)
आठवड्याला जास्तीत जास्त ४८ तास काम
नव्या नियमांनुसार, दैनिक वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य कामकाजाचा दिवस आठ तासांचा असेल. इतर वेतन कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांचे आठवड्याचे कामाचे तास ४८ पेक्षा अधिक असू शकणार नाहीत. म्हणजेच, आठवड्याला किमान ४८ तास काम करणे बंधनकारक नसून ही कामाच्या तासांची कमाल मर्यादा आहे. (Maharashtra Wage Rules 2026)
प्रत्येक आठवड्यात साप्ताहिक विश्रांती
प्रत्येक कर्मचाऱ्याला नियमानुसार आठवड्यातून एक दिवस विश्रांती देणे आवश्यक आहे. सहा दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यात सामान्यतः रविवार हा विश्रांतीचा दिवस असेल. मात्र, नियोक्ता परिस्थितीनुसार दुसरा दिवसही निश्चित करू शकतो. विश्रांतीच्या दिवशी काम करून घेतल्यास कर्मचाऱ्याला बदली विश्रांती देण्याची तरतूद आहे. (Maharashtra Wage Rules 2026)
सुट्टीच्या दिवशी काम केल्यास दुप्पट दराने अतिकालिक वेतन
कर्मचाऱ्याला साप्ताहिक विश्रांतीच्या दिवशी काम करावे लागल्यास त्याला सामान्य वेतनदराच्या किमान दुप्पट दराने अतिकालिक वेतन देणे आवश्यक आहे. यासोबतच नियमांनुसार बदली विश्रांतीची तरतूदही लागू होते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी काम करून घेणाऱ्या आस्थापनांना या नियमांचे पालन करावे लागेल. (Maharashtra Wage Rules 2026)
महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा
नव्या नियमांमध्ये परिवर्तनीय महागाई भत्त्याच्या गणनेबाबतही तरतूद करण्यात आली आहे. किमान वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची गणना दरवर्षी १ एप्रिलपूर्वी आणि १ ऑक्टोबरपूर्वी केली जाईल. यासाठी भारत सरकारच्या श्रम ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाचा आधार घेतला जाणार आहे. (Maharashtra Wage Rules 2026)
वेतन कपातीवर ५० टक्क्यांची मर्यादा
एका वेतन कालावधीत कर्मचाऱ्याच्या वेतनातून होणारी एकूण कपात ५० टक्क्यांपेक्षा अधिक करता येणार नाही. कपातीची रक्कम या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास उर्वरित रक्कम पुढील वेतन कालावधीत टप्प्याटप्प्याने वसूल करावी लागेल.
दंड किंवा नुकसानभरपाईच्या नावाखाली वेतन कपात करण्यापूर्वी कर्मचाऱ्याला लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कारणे दाखवा नोटीस देणे आणि त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देणे बंधनकारक आहे. (Maharashtra Wage Rules 2026)
वेतनाच्या नोंदी पाच वर्षे जतन कराव्या लागणार
नियोक्त्यांना कर्मचारी नोंदवही, वेतन आणि अतिकालिक वेतन नोंदवही तसेच उपस्थिती नोंदवही इलेक्ट्रॉनिक किंवा कागदी स्वरूपात ठेवावी लागेल. या नोंदी शेवटची नोंद केल्यापासून पाच वर्षे जतन करणे आवश्यक आहे. तसेच वेतन देण्याच्या दिवशी किंवा त्यापूर्वी कर्मचाऱ्याला वेतन पावती देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. (Maharashtra Wage Rules 2026)
किमान वेतनाची गणना कशी होणार?
राज्य सरकार किमान वेतनाचा दर दैनंदिन आधारावर निश्चित करणार आहे. दैनंदिन वेतनाला आठने भागून तासाचा दर, तर २६ ने गुणून मासिक दर निश्चित केला जाईल. कामाच्या स्वरूपानुसार अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Wage Rules 2026)
नव्या नियमांमध्ये वेतनाची व्याख्याही स्पष्ट करण्यात आली आहे. त्यात मूळ वेतन, महागाई भत्ता आणि रिटेनिंग भत्ता यांचा समावेश आहे. काही भत्ते आणि अन्य घटकांचे प्रमाण एकूण मोबदल्याच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त रक्कम वेतनात समाविष्ट करण्याची तरतूद आहे. (Maharashtra Wage Rules 2026)
कर्मचाऱ्यांना तक्रारीसाठी अर्ज करता येणार
वेतन, साप्ताहिक विश्रांतीचे मानधन, अतिकालिक वेतन, बेकायदेशीर कपात, किमान बोनस किंवा वेतनातील लिंगभेदासंबंधी तक्रार असल्यास कर्मचारी, नोंदणीकृत कामगार संघटना किंवा निरीक्षक-सुविधाकार विहित नमुन्यात संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करू शकतात. हा अर्ज प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल करता येईल. (Maharashtra Wage Rules 2026)
दरम्यान, या नव्या नियमांमुळे वेतन संहितेच्या कक्षेत येणाऱ्या आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या वेतन व्यवस्थापनाला अधिक स्पष्ट चौकट मिळणार आहे. कामाचे तास, साप्ताहिक विश्रांती, अतिकालिक वेतन आणि वेतन कपातीसंदर्भातील तरतुदींचे पालन करणे आता संबंधित नियोक्त्यांसाठी आवश्यक असेल. (Maharashtra Wage Rules 2026)





