Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचे जोरदार कमबॅक; ‘या’ जिल्ह्यांना अवकाळीने झोडपले
Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ऑक्टोबर हिट आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने मोठा दिलासा दिला आहे.

Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, अहिल्यानगर, सातारा आणि बीड जिल्ह्यांतील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. कुठे जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, तर कुठे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेषतः पुण्यातील आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात संध्याकाळी दमदार पाऊस झाला. (Maharashtra Rain)
हिंजवडीत पावसाचा जोर; रस्त्यांवर पाणी साचले
पुणे जिल्ह्यातील हिंजवडी परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी-चिंचवड शहरातही संध्याकाळपासून ढगाळ वातावरण होते. याचदरम्यान शहरातील काही भागांसह हिंजवडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. (Maharashtra Rain)
जामखेडमध्ये विजांच्या कडकडाटासह सरी
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या उकाड्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. शहरातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. (Maharashtra Rain)
साताऱ्यात पावसामुळे रस्त्यांवरून वाहू लागले पाणी
सातारा शहर आणि ग्रामीण भागातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, शेतीसाठीही तो उपयुक्त ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऊस आणि ज्वारीच्या पिकांना या पावसाचा फायदा होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Rain)
बीडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; आणखी पावसाची प्रतीक्षा
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा, कडा आणि परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या. रविवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Rain)
मात्र, हा पाऊस पुरेसा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पिकांना चांगला आधार मिळण्यासाठी आणखी पावसाची गरज असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. (Maharashtra Rain)
पावसामुळे उकाड्यापासून दिलासा; पुढील पावसाकडे लक्ष
एकीकडे अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे काही भागांतील शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. मात्र, पाऊस सर्वत्र समान प्रमाणात झालेला नसल्याने पुढील काळात पावसाची साथ कायम राहणार का, याकडे नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Rain)
Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट




