अमृत महोत्सवातही महा’राष्ट्र अव्वल

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत’ आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असून, राज्यात पुणे जिल्ह्याने अग्रस्थान मिळविले आहे. देशात झालेल्यापैकी तब्बल 75 टक्के उपक्रम एकट्या महाराष्ट्रात राबवण्यात आले आहेत, असे प्रशासनाने सांगितले.
“स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्ताने 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती खास अमृतमहोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर भरणे अपेक्षित होते.
यामध्ये संपूर्ण भारतातून ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्य या चारही स्तरावर सर्वांत जास्त 4 लाख 4 हजार 282 इतक्या उपक्रमांचे आयोजन व संकेतस्थळावर माहिती भरून महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल झारखंड 48 हजार व गुजरात 42 हजार उपक्रम अंमलबजावणीसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावरील झारखंडपेक्षा तब्बल आठ पट अधिक उपक्रम महाराष्ट्राने राबवले आहेत.
महाराष्ट्रात राज्यस्तरावरील 21 उपक्रम, जिल्हा परिषद स्तरावर 3 हजार 592, तालुका पंचायत स्तरावर 10 हजार 574 तर ग्रामपंचायत स्तरावर 3 लाख 90 हजार 95 इतक्या उपक्रम आयोजनाची माहिती संकेतस्थळावर भरण्यात आली आहे. यात शिक्षण घटकांतर्गत मॉडेल स्कुल कार्यक्रम, महिला स्वयंसहायता गटांसाठी थेट खरेदी विक्री स्टॉल उपक्रम, शिक्षक प्रशिक्षण, महाआवास पारितोषिक वितरण, ग्रामीण गृहबांधणी, जीवनोन्नती अभियान उपक्रम आदी अनेक उपक्रमांचे आयोजन
करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.
पुणे राज्यात पहिले
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत संकेतस्थळावर 1 लाख
1 हजार 935 उपक्रमांची माहिती भरत पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल अहमदनगर जिल्ह्याने दुसरा व गडचिरोली जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. यासाठी पुणे जिल्हा परिषदेने स्वतंत्रपणे निधीची तरतूद केली होती. जिल्ह्यातील सर्वच घटकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने पुणे जिल्ह्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशी माहिती प्रशासक आयुष प्रसाद यांनी दिली.





