2030 पर्यंत अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून 50 टक्के ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनेल : देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्यात सौरऊर्जा क्षेत्रात बरेच बदल होत आहेत. अवघ्या अडीच वर्षांत राज्य सरकारने 20,000 मेगावॅटचे सौर प्रकल्प मंजूर केले आहेत. तसेच 2030 पर्यंत अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून 50 टक्के ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागपूर येथे विविध विकासकामांची पायाभरणी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षांत राज्याची सौरऊर्जेची 40,000 मेगावॅट क्षमता आहे. मात्र, आता अवघ्या एका वर्षात सौरपंप साठवण प्रकल्पाची क्षमता ५५ हजार मेगावॅट झाली आहे.
त्याचप्रमाणे पवन आणि सौर प्रकल्पांची क्षमता सुमारे 20,000 मेगावॅट आहे. महाराष्ट्र सरकार ज्या प्रकारे सौर आणि अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांवर काम करत आहे, त्यावरून 2030 पर्यंत, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून 50 टक्के ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनेल, असे त्यांनी सांगितले.




