महाराष्ट्र हादरला..! लैंगिक अत्याचार करुन 4 वर्षाच्या मुलीची हत्या; मृतदेह लपवला पेटीत

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चिमुकल्या मुलीवर अत्याचार करुन तिचा मृतदेह घरातील एका पेटीमध्ये लपवून ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पांडुरंग सोमनिंग कळळी-पुजारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी जत तालुक्यामधील करजगे गावात घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यामधील करजगे गावामध्ये चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून बलात्कार करून झाल्याचा दाट संशय असून पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच ते स्पष्ट होणार असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
चिमुकली सकाळपासून बेपत्ता
संशयित आरोपी पांडुरंग कळळी-पुजारी हा चिमुकलीच्या घराशेजारी राहण्यास आहे. संबंधित मुलगी गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होती, नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र, ती कुठे मिळून आली नाही. त्यामुळे मुलगी बेपत्ता झाल्याबाबत गावात दवंडी पिटवून शोध सुरू करण्यात आला होता. तसेच बालिका बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील गावात दाखल झाले.
दरम्यान, पोलिसांनी शोध घेतला असता पांडुरंग कळळी-पुजारी हा संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्याच्यावर संशय बळवल्याने त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरातील एका पत्र्याच्या पेटीमध्ये मृतावस्थेत संबंधित चिमुकली मिळून आली. पोलिसांनी पांडुरंग कळळी-पुजारी याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बालिकेचा खून केल्याची कबुली दिली. बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.





