Maharashtra । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (आरएसएस) मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत आहे. जनतेने जनादेश दिला आहे, त्यानुसार सर्व काही होईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. याचा प्राधान्याने विचार करावा लागेल. वर्षभर मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून तो आता थांबवण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले आहे. यावर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर काल उद्धव ठाकरे आणि आज संजय राऊत यांनी भाजपासह सरसंघचालकांना पण चिमटे काढले. संजय राऊत म्हणाले,’आरएसएसचं म्हणणं भाजपवाले ऐकतात का? खासकरून मोदी शाह आरएसएसचं ऐकतात का ? आरएसएस एकेकाळी भाजपची मातृसंस्था होती. संघाने भाजपला वाढवलं. एक नैतिक ताकद दिली. पण गेल्या दहा वर्षात भाजपच्या बड्या नेत्यांनी पहिलं काम कोणतं केलं तर ते म्हणजे संघाला संपवण्याचं असा गंभीर आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, ‘संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्यावर पण निशाणा साधला. मोहन भागवत तरी कुठे गेले मणिपूरला. मोहन भागवत गेले का काश्मीरला. आम्हाला त्यांच्याकडून आशा आहे. मोदी शाह जात नसतील तर तुम्ही जा. तुमच्यासोबत आम्ही येतो. देशाच्या सुरक्षेचं प्रकरण आहे. तुम्ही नेतृत्व करा. आम्ही येतो. केवळ गप्पा मारून काय होतं.’असा टोला पण त्यांनी लगावला.