Maharashtra Rain : अवकाळीचा कहर! पावसाने काढलेल्या पिकांचीही नासाडी

Maharashtra Rain – शेतांमध्ये काढून ठेवलेल्या कांद्यासह विविध पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, उभ्या पिकांचाच पंचनामा करण्याचे सरकारचे धोरण असल्याने काढून ठेवलेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता धूसर आहे. विशेष म्हणजे काढणी केलेल्या पिकांचे पंचनामे करण्याची तरतूदच नसल्याने नेमके किती नुकसान झाले, याची माहिती आमच्याकडे नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
जिल्ह्यात रविवारी व सोमवारी सिन्नरसह काही तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सिन्नर मंडळात विक्रमी १५०.३ मिलीमीटर, तर डुबेरे मंडळात १४५.२ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय वावी मंडळातदेखील ६८.४ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. सिन्नर गावठाणात तर ढगफुटी नोंदविली गेली आहे. पिकांच्या हानीबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होते आहे.
शेतांमध्ये उभ्या असलेल्या म्हणजेच कापणी न केलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून केले जातात. अशा पिकांच्या नुकसानीपोटी सरकारी नियमानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली जाते. त्यामुळे अशा नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत. एकट्या सिन्नर तालुक्यात आतापर्यंतच्या पावसामुळे १५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
बहुतांश पिकांची कापणी पूर्ण झाली असून, ही पिके शेतामध्येच काढून ठेवण्यात आली आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढून तो शेतांमध्येच ठेवला होता. अशा कांद्याचे पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने सोमवारी वर्तविला.
परंतु, नेमके किती नुकसान झाले याची माहिती प्रशासनाकडेही नाही. अशा पिकांचे पंचनामे महसूल यंत्रणेकडून केले जात नाहीत. त्यामुळे पिकांची कापणी करून ती शेतांमध्ये ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत होणार नसल्याचे चित्र सध्या आहे.





