Pune News : ‘वाघोलीत ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू’; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खांदवे नगर जीनियस स्कूल शेजारी सुरू करण्यात आला असून याचे ऑनलाइन उद्घाटन पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, विधानपरिषद उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
वाघोली येथे फित कापून शिरूर हवेली चे आमदार माऊली कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या हस्ते दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्ह्यात ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेअंतर्गत वाघोली येथे दवाखाना नव्याने सुरू करण्यात आला आहे. दवाखान्यासाठी जागा निश्चित झाली नव्हती आता ती खांदवे नगर जीनियस स्कूल शेजारी हा दवाखाना सुरु करण्यात आला आहे.
राज्यात असे ७०० दवाखाने सुरू केले जाणार आहेत. यामुळे मुख्य रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, दर २५ ते ३० हजार लोकसंख्येच्या वस्तीसाठी हा ‘आपला दवाखाना’ सुरू केला जाणार असल्याची योजना आहे. वाघोली येथे दवाखाना वाघोली येथे सुरू झाल्याने वाघोलीतील परिसरातील नागरिकांना उपचार घेण्यासाठी या दवाखान्याची मोठी मदत होणार आहे.
आपल्या दवाखान्याची कार्यपद्धती..
आपला दवाखाना वाघोली येथे डॉक्टरांद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळेल. दवाखान्यांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत हे दवाखाने सुरू राहतील. रुग्णांना केसपेपर काढावा लागेल.
दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल. रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण, निदान केलेली पद्धती याची माहिती घेतली जाईल.
वाघोली परिसरातील नागरिकांसाठी उत्तम रुग्णसेवा माफक दरात उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
वाघोली व परिसरासाठी कायमस्वरूपी मोठे रुग्णालय व्हावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. आपला दवाखाना सुरू झाल्याने वाघोलीकरांना आरोग्याच्या बाबतीत मोलाची मदत होणार आहे.
– रामभाऊ दाभाडे, माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे




