Maharashtra Politics : भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ‘या’ नेत्याकडे सोपवणार?

मुंबई : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज दुपारी चार वाजता नागपूरमधील राजभवनामध्ये नव्या मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. भाजपाने ज्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं आहे त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचाही समावेश आहे.
मात्र बावनकुळेंकडे मंत्रिपद सोपवण्यात आल्यास त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप कोणाकडे हे पद सोपवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘या’ नेत्याकडे सोपवले जाऊ शकते प्रदेशाध्यक्षपद
महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद हे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. रविंद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. रविंद्र चव्हाण हे एक उत्तम संघटक म्हणून पक्षात ओळखले जातात. तसेच फडणवीस यांच्याकडून पडद्यामागे होणाऱ्या अनेक हलचालींमध्ये रविंद्र चव्हाणांचा सक्रीय सहभाग असायचा. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी दिली जाऊ शकते.
रवींद्र चव्हाण यांच्याविषयी
विंद्र चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 साली कल्याण येथे झाला. ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून 2009, 2014, 2019 आणि आता 2024 असे सलग चार टर्म निवडून आले आहेत. रविंद्र चव्हाण यांनी यापूर्वी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. तसेच शिंदे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री राहिले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आली होती.





