Maharashtra Politics : महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या कोणाच्या वाट्याला किती महामंडळे?

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध महामंडळांवर नियुक्त्या करण्याबाबत महायुतीमध्ये असणारा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महामंडळ वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या सूत्रावर महायुतीमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.
काय आहे फॉर्मुला?
मागील काही महिन्यांपासून महामंडळाच्या वाटपावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू होती. आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठकदेखील पार पडली. या बैठकीमध्ये महामंडळाच्या वाटपावर चर्चा होऊन फॉर्मुला निश्चित करण्यात आला आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 44 महामंडळे, शिंदे यांच्या शिवसेनेला 33, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळं मिळणार आहेत. यामुळे महायुतीतील ‘मोठा भाऊ’ कोण ? हेदेखील आता स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या महामंडळांवरून रस्सीखेच सुरु
एकीकडे कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती महामंडळ हे निश्चित झाले असले तरी महत्त्वाच्या महामंडळाबाबत अद्याप तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मुंबई म्हाडा (MHADA), सिडको (CIDCO), एमएमआरडीए, एमटीडीसी (MTDC) अशा प्रभावी महामंडळांच्या अध्यक्षपदावर तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. विशेषतः सिडको आणि म्हाडा या दोन्ही महामंडळांवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
नाराज आमदारांची समजूत घालण्यासाठी वाटप?
महामंडळांवरील नेमणुका करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाराज आमदारांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांसह जुन्या कार्यकर्त्यांकडून महामंडळांवरील नियुक्त्यांची मागणी सुरू केली आहे.





