Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होणार; ‘या’ नेत्याचा मोठा दावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात फोडाफोडीचे संकट (Maharashtra Politics) अद्याप पूर्णपणे टळलेले नाही.

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात फोडाफोडीचे संकट (Maharashtra Politics) अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. शिंदे गटाकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला उद्धव ठाकरे यांनी तूर्तास ब्रेक लावला असला तरी, शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी दिलेल्या विधानाने ठाकरे गटातील चिंता वाढली आहे.
नांदेडमध्ये महिलांच्या (Maharashtra Politics) सत्कार कार्यक्रमासाठी आज ज्योती वाघमारे उपस्थित होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणारच. जे पण होणार ते योग्य वेळी होणार.” या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटात मोठी अस्वस्थता
अलीकडच्या काळात ठाकरे गटातील लोकसभेतील ९ खासदारांपैकी सहा खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरात होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे ऑपरेशन घडवण्याचा प्रयत्न केला होता. ठाकरे गट सोडून येणाऱ्या खासदारांना केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्री पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मात्र उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी या खासदारांची विशेष बैठक बोलावली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना थेट सांगितले,“मला तुमच्यावर भरोसा आहे; पण तुम्हाला लढायचे नसेल तर तसे सांगा, मी थांबतो.”
खासदारांनी आपल्या नाराजीचे मुद्दे मांडले. त्यात मुख्यतः उद्धव ठाकरे यांच्याकडून पुरेसा वेळ न मिळणे, सत्तारूढ खासदारांना सरकारकडून मतदारसंघातील कामांसाठी अतिरिक्त निधी मिळणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होणे या गोष्टींचा समावेश होता.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रभावी भाषणात आणि स्पष्ट भूमिकेने खासदारांचे मन परावर्तित केले. त्यामुळे शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ तूर्तास स्थगित झाल्याची चर्चा आहे.
ज्योती वाघमारे यांचे विधान
दरम्यान, शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी नांदेडमधील कार्यक्रमादरम्यान दिलेल्या प्रतिक्रियेत पुन्हा एकदा खळबळ उडवली. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली असून, पुढील काही दिवसांत पक्षांतर्गत बंडाळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पार्श्वभूमी
यापूर्वी भाजपचे ‘लोटस ऑपरेशन’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट यासारख्या मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडल्या होत्या. आता शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेऊन तूर्तास संकट टाळले असले तरी, ज्योती वाघमारे यांच्या विधानाने पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटातील खासदारांच्या (Maharashtra Politics) नाराजीचे मुद्दे अद्याप पूर्णपणे निकालात निघालेले नाहीत. एकनाथ शिंदे गटाकडून सतत दबाव टाकला जात असल्याने ठाकरे गटासाठी पुढील काळ आव्हानात्मक ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. प्रकरण अद्याप चर्चेत असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






