Maharashtra Politics: ‘मविआ’चं एकीचं बळ दाखवणाऱ्या काँग्रेस-ठाकरे गटात धुसफूस? दबक्या आवाजात चर्चा

मुंबई – निवडणूक आयोनाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. यावेळी महाराष्ट्रातील निवडणूका जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या बंडखोरीनंतर राजकीय समीकरणे बिघडली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी, सध्या सुरू असलेल्या जागावाटपावरून मित्रपक्षच प्रतिस्पर्धी असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेतील कामगिरीनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे जागावाटपासंदर्भात महायुतीकडूनही बैठकांचा सिलसिला सुरु आहे. या सर्व घडामोडींदरम्यान कॉंग्रेसने मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का देत 48 पैकी 30 जागा जिंकल्या. तर महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस 13 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांना राज्यभर मिळालेल्या सहानुभूतीचा सर्वाधिक फायदा मिळाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
म्हणूनच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेसाठी काँग्रेस 130 हून अधिक जागांची मागणी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या मागणीकडेकडे देखील काँग्रेसने कानडोळा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे एकीचं बळ दाखवणाऱ्या काँग्रेस-ठाकरे गटात धुसपूस सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
शिवसेनेला मुस्लीम मतदारांचा पाठिंबा –
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लीम समाजाच्या रूपाने नवा मतदार लोकसभेत मिळाला. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने ठाकरे गटाला मतदान केल्यामुळेच त्यांच्या अनेक जागा आल्या. शिवसेना हा एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लीम समाज अंतर राखत होता. मात्र आता चित्र बदलले असून ठाकरेच्या शिवसेनेला मुस्लीम मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे.
मात्र ठाकरे गटाची ही वाढती ताकद काँग्रेसला नकोशी वाटत आहे. कारण महाविकास आघाडीत राहून मुस्लीम मतदार ठाकरे गटाच्या बाजूने वळल्याने काँग्रेसची धास्ती वाढली आहे.





