Maharashtra Politics : पवारांचा भाजपला आणखी एक धक्का; पुण्यातील माजी आमदारानं हाती घेतली तुतारी….

Maharashtra Politics (Pune) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनिती आखल्याचं दिसत आहे. काहीच दिवसापूर्वी कोल्हापूरचे समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता पुण्यातील वडगाव शेरीतदेखील भाजपला मोठा धक्का बसला आहे.
वास्तविक, पुण्यात शरद पवारांनी जुना मासा गळाला लावला आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे यांनी भाजपला रामराम करून हाती तुतारी घेतली आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह महादेव पठारे, महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव आणि दोन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (17 सप्टेंबर 2024) या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे पुण्यात शरद पवार गटाची ताकद वाढली आहे.
दरम्यान, बापूसाहेब पठारे 2009 मध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला होता अन् निवडणुकीच्या कालावधीत झालेल्या गटबाजीमुळे पठारेंनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आता पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये ( शरद पवार गट) प्रवेश केला आहे.
दरम्यान, साल 2019 मध्ये त्यांना संधी मिळेल, पक्षाकडून त्यांना तिकीट दिलं जाईल अशी चर्चा होती. पण भाजपनं मुळीक यांनाच पुन्हा संधी दिली होती. त्यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील टिंगरेंनी पराभव केला होता. सध्या राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज होते. गणेशोत्सव 2024 दरम्यान थेट गणपती मंडळाच्या कार्यक्रमातूनच हाती तुतारी घेणार असल्याचे त्यांनी संकेत दिले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं चिन्ह तुतारी असल्याचं बापूसाहेब पठारे यांनी म्हटलं होतं. तसेच आता लोकसभा निवडणुकीतील राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीला दिलेला कौल पाहता पठारेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.




