महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आले असून, विशेषतः मराठवाड्यात या तणावाची तीव्रता जास्त दिसून येत आहे. नुकतीच बीडमध्ये ओबीसी नेत्यांची ‘महाएल्गार सभा’ पार पडली, ज्यामुळे आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांना जय भगवान महासंघाकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जय भगवान महासंघाचा निवडणूक रणसंग्रामात प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्याने मराठवाड्यात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जय भगवान महासंघाने निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे. महासंघाने मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. जय भगवान महासंघाचे नेते बाळासाहेब सानप यांनी थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हान देत म्हटले कि, “जो कोणी ओबीसींचा विचार करेल, तोच आमच्यासोबत राहील.” या निवडणुकीत मराठा समाजालाही सोबत घेण्याची तयारी महासंघाने दर्शवली आहे. जातीयवाद संपवण्याचा संकल्प बाळासाहेब सानप यांनी निवडणुकीच्या माध्यमातून जातीवाद संपवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “या निवडणुकीतून आम्ही मराठा आणि ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करू. जातीवादाचा अंत व्हावा, हा आमचा उद्देश आहे.” मराठवाड्यात जय भगवान महासंघ किती जागांवर उमेदवार उभे करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महासंघाच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वंजारी समाजाची मागणी आणि निवडणूक रणनीती जय भगवान महासंघाने वंजारी समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गात समावेश करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. बाळासाहेब सानप यांनी स्पष्ट केले की, ही मागणी निवडणुकीच्या काळातही जोरदारपणे मांडली जाईल. “या मागणीच्या बळावरच आम्ही निवडणूक लढणार आहोत,” असे सानप यांनी ठामपणे सांगितले. महासंघाच्या या रणनीतीमुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.