चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंना धक्का, या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई – शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर सोमवारी (दि.10) केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे चिन्ह बहाल केले आहे. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पक्षाला धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग येथील तीन उपजिल्हाप्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे.
सचिन देसाई, सुनील डुबळे आणि बाळा दळवी अशी शिंदे गटात प्रवेश केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल चिन्हं मिळाले आहेत तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले असून ‘तळपता सूर्य’ े चिन्ह मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईतील अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी हे पक्ष नाव आणि चिन्ह मिळाले आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. 3 नोव्हेंबरला येथील निवडणूक असून 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरु आहे. अशातच ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हा ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे.




