Pune News : टॅंकरच्या पाण्यात ई-कोलाय, काॅलीफार्म हा बॅक्टेरीया; सर्वच्या सर्व टॅंकर पाॅंईटचे पाणी दूषित

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी, किरकटवाडी, नांदेड तसेच डीएसके विश्व परिसरात गेल्या काही दिवसांत मोठया प्रमाणात गुलेन बॅरे सिंड्रोमच्या ( जीबीएस) बाधीत रूग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महापालिकेकडून या भागात खासगी टॅंकरने दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या बोअरवेलची तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. या भागात पाणी पुरविणाऱ्या सर्व १५ टॅंकर भरणा केंद्राच्या बोअरवेलच्या पाण्यात दूषीत पाण्यात आढळणारा ई-कोलाय हा बॅक्टेरीया सापडला आहे. त्यामुळे, या सर्व टॅंकर भरणा केंद्रावर महापालिकेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी ही माहिती दिली आहे. तसेच,या सर्व केंद्राना तातडीनं नोटीस बजाविण्यात येणार असून महापालिकेने दिलेली ब्लिचिंग पावडरचा वापर टॅंकरमध्ये करूनच नागरिकांना पाणी द्यावे अशा सूचना दिल्या असून त्याकडे दूर्लक्ष होत असल्याचे पुन्हा केलेल्या तपासणीत समोर आल्यास सार्वजनिक आरोग्यास हानी पोहचविण्याचा ठपका ठेवून हे भरणा केंद्र कायमची बंद केली जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
जीबीएस प्रादूर्भाव वाढल्यानंतर महापालिकेकडून केवळ पालिकेच्याच पाण्याचे नमूने घेतले जात असून या भागात मोठया प्रमाणात पालिकेकडे नोंदणी नसलेले टॅंकरही पाणी पुरवठा करत आहेत. तसेच त्यांच्या तपासणीकडे दूर्लक्ष केले जात असल्याची बाब दैनिक प्रभातने विहिर तपासली ; टॅंकर मोकाट ? या मथळ्याद्वारे उघडकीस आणली होती. त्याची दखल घेत महापालिकेने या टॅंकर भरणा केंद्राचे नमूने तपासणीसाठी दिले होते.
काय आहे प्रयोग शाळेचा अहवाल ?
महापालिका आयुक्तांकडून या भागात पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व टॅंकर भरणा केंद्रातील पाण्याचे नमुने घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्वारगेट पाणी पुरवठा विभागाकडून धायरी, मानाजी नगर, माळवाडी भागातील खासगी टॅंकर भरणा केंद्रातील पाण्याचे नमूने २८ जानेवारी रोजी संकलीत करून महापालिकेच्या पर्वती येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले होते. त्याचे अहवाल ३० जानेवारीला प्राप्त झाले आहेत.
त्यात सर्वच्या सर्व १५ टॅंकर भरणा केंद्राच्या पाण्यात ई-कोलाय व काॅलीफार्म हा बॅक्टेरीया आढळला आहे. प्रति १०० मि. ली पाण्याया या दोन्ही बॅक्टेरीयाचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. तसेच या पाण्यात रेसिड्युअल क्लोरिन टेस्टही आढळलेली नाही. त्यामुळे या पाण्याचा जड पणा महापालिकेच्या पिण्याच्या पाण्या पेक्षा जास्त असून हे पाणी पिण्या योग्य नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रयोग शाळेचा अहवाल प्राप्त झाला असून सर्वच्या सर्व टॅंकर भरणा केंद्राच्या पाणी दूषीत असून पिण्यायोग्य नाही. सर्व टॅंकर पुरवठादार हे पाणी पिण्यासाठी देत नसल्याचा दावा करत आहेत. मात्र, या पाण्यात ई-कोलाय , काॅलीफार्म हा बॅक्टेरीया आढल्याने सर्वांना नोटीसा बजाविण्यात येत आहेत. तसेच हे पाणी वापरण्यासाठी देण्यापूर्वीही त्यात ब्लिचिंग पावडर देवूनही ती मिसळली जात नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
– नंदकिशोर जगताप (पाणी, पुरवठा विभाग प्रमुख)






