FASTag News : …तर तुम्हालाही दुप्पट टोल भरावा लागणार; महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राज्य सरकारने फास्ट टॅग संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता तुमच्या कारला फास्ट टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. आणि जर तुम्ही असे केले नाहीतर तुम्हाला दुप्पट पैसे भरावे लागतील.
टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्ट टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. फास्ट टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. त्यामुळे आता १ एप्रिलपासून राज्यातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे.
अन्यथा द्यावे लागणार दुप्पट पैसे
जर तुम्ही तुमच्या वाहनाला फास्ट टॅग लावले नाही आणि तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील. हा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निश्चित केलेल्या धोरणांशी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशाशी सुसंगत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.





