New Rules : महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू; 12 वर्षांखालील मुलांना एकट्याने लिफ्ट वापरण्यास बंदी
New Rules : महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून नवे लिफ्ट सुरक्षा नियम लागू. १२ वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्ट वापरता येणार नाही. सीसीटीव्ही, तपासणी आणि अपघाताच्या तक्रारींबाबत महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

New Rules : महाराष्ट्र सरकारने लिफ्ट, एस्कलेटर आणि सरकत्या मार्गांच्या वापराबाबत नवी सुरक्षा नियमावली लागू केली आहे. त्यानुसार, १२ वर्षांखालील मुलांना प्रौढ व्यक्तीशिवाय लिफ्ट, एस्कलेटर किंवा मूव्हिंग वॉकवेचा वापर करता येणार नाही. १ नोव्हेंबर २०२६ पासून हे नियम लागू झाले आहेत. निवासी इमारती, शॉपिंग मॉल आणि नियमांच्या कक्षेत येणाऱ्या अन्य आस्थापनांनाही हे नियम लागू असतील. लिफ्टमधील अपघात टाळणे आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे हा या नियमांचा उद्देश आहे.
१२ वर्षांखालील मुलांसाठी प्रौढ व्यक्ती आवश्यक –
महाराष्ट्र लिफ्ट्स, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉकवेज नियम, २०२६ मधील नियम १० (१३) नुसार, १२ वर्षांखालील मुलांना लिफ्ट, एस्कलेटर किंवा सरकत्या मार्गाचा वापर एकट्याने करता येणार नाही. त्यांच्यासोबत प्रौढ व्यक्ती असणे बंधनकारक आहे. मात्र, १२ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना या विशिष्ट नियमातून सूट आहे.
नवीन लिफ्टमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक –
नवीन लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. तसेच, जुन्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही, ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस (ARD) आणि ओव्हरलोड प्रोटेक्शन डिव्हाइस (OLPD) नसल्यास ती उपकरणे बसवावी लागतील. यासाठी २८ ऑक्टोबर २०२६ पासून एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच, संबंधित यंत्रणा बसवण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२७ पर्यंत वेळ आहे.
दर महिन्याला तपासणी, वर्षातून सुरक्षा ऑडिट –
नव्या नियमांनुसार, लिफ्टची देखभाल आणि तपासणी दर महिन्याला मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून करणे आवश्यक आहे. तसेच, वर्षातून किमान एकदा सुरक्षा तपासणी आणि ऑडिट करावे लागेल. त्याची नोंद ठेवणेही बंधनकारक आहे.
अपघाताची माहिती २४ तासांत द्यावी लागणार –
लिफ्ट, एस्कलेटर किंवा सरकत्या मार्गावर अपघात झाल्यास त्याची माहिती २४ तासांच्या आत विद्युत निरीक्षक आणि संबंधित स्थानिक पोलीस ठाण्याला द्यावी लागेल. अपघातानंतर संबंधित यंत्रणेचा वापर थांबवून आवश्यक परवानगी मिळेपर्यंत ती पुन्हा सुरू करता येणार नाही. तसेच, लिफ्ट ऑपरेटरचे वय किमान १८ वर्षे असणे आणि त्याला योग्य प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.
असुरक्षित लिफ्ट बंद करण्याचे अधिकार –
लिफ्ट किंवा अन्य यंत्रणा सुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करता येईल. यंत्रणा असुरक्षित असल्यास तिचा वापर बंद करण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात. हे नियम महाराष्ट्र लिफ्ट्स, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉकवेज अधिनियम, २०१७ अंतर्गत तयार करण्यात आले आहेत. २०२६ मध्ये या कायद्यात सुधारणा करून परवाने आणि तपासणी प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत.





