महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने पसंत केली “बुलेट’

सातारा -जिल्ह्यातील कुस्तीच्या परंपरेला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी खा, उदयनराजे भोसले यांनी यंदाचा महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटीलला एक लाख रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले होते. या बुलेटच्या पसंतीसाठी पृथ्वीराज पाटीलने मंगळवारी दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील शोरूमला भेट दिली. क्लासिक 350 रॉयल एनफिल्ड बनावटीचे टॉप मॉडेल त्याने पसंत केले. उदयनराजे मित्रसमूहाकडून उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर याला होंडा युनिकॉर्न मोटारसायकल भेट देण्यात येणार आहे
यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुस्त्यांपेक्षा आयोजकांकडून देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेवरून झालेल्या वादाने रंगली. या वादानंतर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांच्यावर मंत्रिगण, खासदार, आमदारांनी बक्षिसांचा वर्षाव केला. खा. उदयनराजेंनी पृथ्वीराज पाटीलला एक लाख रुपये किमतीची बुलेट मोटारसायकलचे बक्षीस जाहीर केले.
या शब्दाला जागून उदयनराजे मित्रसमूहाने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात शोरूमला मंगळवारी दुपारी भेट देऊन सिल्व्हर व पर्पल कलरचे क्लासिक 350 हे बुलेटचे टॉप मॉडेल पसंत केले. या मोटारसायकलचे वितरण खा. उदयनराजेंच्या हस्ते पृथ्वीराज पाटीलला लवकरच केले जाणार आहे. त्याच कार्यक्रमात उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकरलाही होंडा युनिकॉर्न मोटारसायकल भेट म्हणून दिली जाणार आहे.





