महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला ; बेळगावजवळ महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आल्यामुळे टोलनाक्यावर वातावरण चिघळले आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा आज बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी त्यांना बेळगाव दौरा करण्यास मनाई केली होती. तरीही ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी आक्रमक झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रातील पाच-ते सहा वाहनांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यातील काही वाहने पुण्यातील आहेत. या प्रकारानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांसह नारायण गौडा यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.





