Teacher Dress Code : आता विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही गणेवशात दिसणार; शिक्षणमंत्र्यांचं विधान अन् शिक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

Teacher Dress Code : महाराष्ट्रातील शिक्षकही आता गणेवशात दिसणार आहेत. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. ड्रेसकोडसाठी खारीचा वाटा म्हणून शासननिधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे सुतोवाच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
मालेगाव तालुक्यातील अजंग जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीआरएस) अंतर्गत शैक्षणिक डेस्कसह शालेय बॅगच्या वितरणप्रसंगी मंत्री दादा भुसे बोलत होते. या कार्यक्रमातच सर्वच शिक्षक गणवेशात असल्याने मंत्री भुसे यांनी कौतुक करत राज्यभरातील शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचे संकेत दिले. आता शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत.
यावेळी बोलताना दादा भुसे म्हणाले, शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलींसारखे उपक्रम राबवावेत, असंही मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.
ड्रेसकोड सक्तीबद्दल शिक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
जूनपासून शिक्षकांना ड्रेसकोड सक्तीबद्दल शिक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शासनाने शिक्षकांना गणवेश लागू करण्याऐवजी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विषयाला शिक्षक द्यावेत, अशी सुरुवात करून शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर देवराम सरोदे यांनी कळीच्या प्रश्नांकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले.
शाळांना वेतनेतर अनुदान द्या, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्या, कमी पटसंख्येचे कारण देऊन डोंगराळ भागातील, आदिवासी पाड्यातील शाळा बंद करू नका, संच मान्यतेचे निकष बदलून विषयाचे शिक्षक कमी करू नका, अशा मागण्या करतानाच शिक्षकांना गणवेश दिल्यामुळे राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेत कोणता फरक होणार आहे? नको त्या गोष्टीवर लक्ष पैसा खर्च करण्याऐ-वजी राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल याकडे सरकारने लक्ष द्याव, असा सल्लाही सरोदे यांनी दिला.





