महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

पुणे : महाराष्ट्र सरकारकडून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड करण्यात आली होती. आता शेखर मुंदडा यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
दिवसेंदिवस देशी गाईच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. विसाव्या पशुगणनेमध्ये देशी गोवंशीय पशुधनाची संख्या २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान टिकून राहण्याची क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती यामुळे देशी गोवंशीय पशुधनाचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे, अशी माहिती शेखर मुंदडा यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत ८२८ गोशाळा असून त्यामध्ये एक लाख २३ हजार ३८९ पशुधन आहे. देशी गाईला राज्यमाता घोषित करण्यात आले आहे. त्यामुळेच या देशी गाईंची जबाबदारी देखील शासनाने घेतली असून नोंदणीकृत गोशाळांमधील प्रत्येक देशी गोवंशाला प्रतिदिन पन्नास रुपये पोषणासाठी दिले जाणार आहेत. जेणेकरुन गोवंशीय पशुधनात वाढ होईल. गोवर्धन गोवंश योजने अंतर्गत १५ ते २५ लाख रुपये प्रत्येक तालुक्यात एक असे ३२४ तालुक्यात देण्यात आल्याचे मुंदडा यांनी सांगितले.





