Maharashtra Flood Relief : मराठवाड्यात महापुराने हाहाकार, सिद्धिविनायक मंदिराकडून मोठी मदत जाहीर

Maharashtra Flood Relief : मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची जमीन खरडून गेली, तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटातून पुरग्रस्तांना सावरण्यासाठी आता विविध स्तरांवरून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मोठी मदत जाहीर केली आहे. मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. या मदतीमुळे पूरग्रस्तांना मोठा आधार मिळणार आहे.
पंढरपूर आणि शेगांवकडूनही मदत –
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनेही पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच पुरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडू प्रसाद, फूड पॅकेट आणि महिलांसाठी रुक्मिणी मातेची महावस्त्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शेगांवच्या श्री गजानन महाराज संस्थानानेही 1 कोटी 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला आहे.
लालबागच्या राजाकडून 50 लाखांची मदत –
मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडळानेही संकटग्रस्तांसाठी हात पुढे केला असून, 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पावसाचा धोका कायम –
मराठवाड्यातील नागरिक पुरातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना, पावसाचा धोका अद्याप टळलेला नाही. भारतीय हवामान विभागाने 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार पावसामुळे शहरी पूराचा धोका आहे, असे राज्य आपत्कालीन केंद्राने सांगितले.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन –
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, धोकादायक आणि पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, वीज पडताना झाडाखाली थांबू नये, तसेच नदी-नाल्यांवरील पूरग्रस्त रस्ते ओलांडू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे आणि स्थानिक निवारा केंद्रांचे सहाय्य घ्यावे, अशीही सूचना आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या संकटकाळात मराठवाड्यातील पुरग्रस्तांना आधार देण्यासाठी सर्व स्तरांवरून मदत सुरू असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.




