Toll Free : राज्यातील ‘या’ वाहनांना टोल माफ; कुठे-कुठे मिळणार सूट?
Toll Free : महाराष्ट्र ईव्ही धोरण २०२५ अंतर्गत इलेक्ट्रिक कार आणि बसना प्रमुख महामार्गांवर १००% टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे.

Toll Free : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. ई-वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यासाठी काही प्रमुख महामार्गांवर टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या धोरणानुसार मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू यांसारख्या प्रमुख मार्गांवर ई-कार आणि ई-बसला 100 टक्के टोलमाफी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवर 50 टक्क्यांपर्यंत टोल सवलतीची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य सरकारने ईव्ही धोरणांतर्गत सुमारे ४६ कोटी रुपयांच्या सवलतींची घोषणा केली आहे. ई-वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन म्हणून कारवर दीड लाख रुपयांपर्यंत आणि दुचाकीसाठी सुमारे १० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
याशिवाय, राज्यात नोंदणी होणाऱ्या ई-वाहनांना रस्ते कर आणि नोंदणी शुल्कात 100 टक्के सूट देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना ई-वाहन खरेदी अधिक परवडणारी होणार आहे.
सरकारच्या मते, या सवलतींमुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ई-वाहनांचा स्वीकार करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

