Maharashtra Epstein Files : ‘आता सगळं उघड होणार!’; ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’चा टीझर प्रदर्शित, अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पहिला लूक चर्चेत
Maharashtra Epstein Files : राज्यभर चर्चेत राहिलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, या टीझरमधील अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पहिला लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Maharashtra Epstein Files : राज्यभर चर्चेत राहिलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, या टीझरमधील अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पहिला लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.
‘आता सगळं उघड होणार…!’ अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझरमधून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याचे संकेत देण्यात आले असून, चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप समोर आले होते. या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. तसेच अनेक राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी त्याचे संबंध असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.
चित्रपटाच्या टीझरमध्ये दिपाली सय्यद या अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका छायाचित्राची आठवण करून देणारा हा प्रसंग असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, चित्रपटाची कथा अद्याप गुप्त ठेवण्यात आली असून, इतर कलाकारांची नावेही जाहीर करण्यात आलेली नाहीत. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी आकाश काकडे यांच्याकडे असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांनी केली असून, सचिन घणवंत हे प्रॉडक्शन हेड तर नेहा घोडके प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून कार्यरत आहेत.
‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’च्या प्रदर्शनानंतर नेमक्या कोणत्या घटनांवर आणि व्यक्तींवर प्रकाश टाकला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





