Maharashtra Railway Corridor : महाराष्ट्रात रेल्वेचे नवे जाळे; ‘या’ भागांना मिळणार थेट कनेक्टिव्हिटी, उद्योगांनाही मोठा फायदा – वैष्णव
Maharashtra Railway Corridor : महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सुरत-डानकुनी पूर्व-पश्चिम रेल्वे कॉरिडॉरची योजना. उद्योग, ग्रामीण भाग, मुंबई लोकल आणि कोकण रेल्वेला मोठा फायदा.

Maharashtra Railway Corridor : महाराष्ट्रातील अनेक अद्याप रेल्वेने न जोडलेल्या भागांना भविष्यात थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून, त्यातून राज्यातील औद्योगिक आणि ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळेल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली.
मुंबईत नव्या सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसच्या उद्घाटनप्रसंगी दिल्लीहून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे’ बोलताना वैष्णव यांनी प्रस्तावित सुरत-डानकुनी पूर्व-पश्चिम रेल्वे कॉरिडॉरची माहिती दिली. या कॉरिडॉरमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र सेवा असतील. पश्चिम महाराष्ट्र, नाशिकसह राज्यातील इतर भागांना याचा फायदा होणार आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व आणि पश्चिम मालवाहतूक कॉरिडॉर एकमेकांना जोडून त्यासोबत नवीन औद्योगिक विकास क्षेत्रे उभारण्याची सूचना केली होती. त्यानुसार या प्रस्तावावर काम करण्यात आल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
पूर्व आणि पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम पूर्ण झाले असून, त्यातून जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून उत्तर, पूर्व आणि मध्य भारतात मालवाहतूक सुलभ होईल. यामुळे मुंबई आणि परिसरातील औद्योगिक विकासासह JNPTच्या कामकाजालाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईतील उपनगर रेल्वेत सध्या सुमारे ३,२०० लोकल सेवा सुरू आहेत. त्यात सुमारे १० टक्के वाढ केल्यास प्रवासी वाहतूक अधिक सक्षम होईल. रेल्वेकडून क्षमता वाढवणे, सिग्नल यंत्रणा सुधारणे आणि नव्या पिढीच्या लोकल सुरू करण्याचे काम सुरू आहे.
चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीला २८ एसी लोकल तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, पहिली ट्रेन २०२७ मध्ये उत्पादनात येण्याची अपेक्षा आहे. २०३० पर्यंत २३८ नव्या लोकल मुंबईला उपलब्ध होतील, असा दावा वैष्णव यांनी केला.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामालाही वेग आला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते ठाणे या समुद्राखालील बोगदा मार्गावर दोन टनेल बोरिंग मशीन एकाचवेळी काम करत आहेत. प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ३५० विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. गरज भासल्यास ही संख्या ३७५ पर्यंत वाढवली जाईल, असेही वैष्णव यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री नितेश राणे आणि मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.





