Nagar | भाजप सरकारचा घमेंड घालवण्याचे काम महाराष्ट्राने केले – आमदार थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी) – दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक निर्माण झाला आहे. सततच्या विकास कामातून येणाऱ्या विधानसभेतही मोठे यश मिळणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असेल असे सांगताना केंद्रातील भाजप सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली असून, राज्य सरकारच्या निवडणुकीपुरत्या असणाऱ्या फसव्या घोषणांना फसू नका, असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
चंदनापुरी येथे आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून पाच कोटी सत्तावीस लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते.
व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ,रणजीतसिंह देशमुख यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. आ. थोरात हे अत्यंत नम्र स्वभावाचे व सर्वांना स्वातंत्र्य देणारे नेतृत्व आहे. आगामी काळामध्ये नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर वरूनच जाण्याकरता आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.
आमदार सत्यजित तांबे, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, डॉ.जयश्री थोरात, मिलिंद कानवडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी लहानभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे अमर कतारी, संजय फड, दिलीप साळगट, संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




