महाराष्ट्र कोरोनामय! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा- आठवले

मुंबई: महाराष्ट्र अगदी कोरोनामय झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 54 हजारहून अधिक झाली आहे. मुंबई देखील कोरोनामय झाली आहे. कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची होती. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी केली आहे.
तसेच, अशास्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली, तरी भाजपचं सरकार येईल असं मला वाटत नाही. कारण भाजपला सत्ता स्थापनेसाठी आघाडीतील तीनपैकी एका पक्षाचा पाठिंबा लागणार आहे. तरच महायुतीचं सरकार येईल, असेही आठवले म्हणाले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील केली राष्ट्रपती राजवटीची मागणी
राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या हजारोंच्या संख्येने वाढत असून दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. याला प्रतिबंध घालण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. या संकटाला हे सरकार योग्य पद्धतीने हाताळू शकले नाही. तसेच या सरकारची क्षमताही नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. करोनामुळे राज्यावर गहिरे संकट आहे. आतापर्यंत जे काही दिले ते केंद्र सरकारने दिले आहे. हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे हे न समजण्यापलीकडे आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना संरक्षित कसं ठेवावे, याचा अभ्यास नाही. त्यामुळे राज्यात सर्वकाही आलबेल सुरू आहे.
राज्यातील करोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्ण आणि मृत्यू वाढत आहेत. याकडे राज्यपालांनी गांभीर्याने पाहावे आणि होणारे मृत्यू थांबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. मनपा आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. अनेक रुग्णांना ऍडमिट न केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, मात्र यांच्याकडून काहीच होत नाही. नाचता येईना अंगण वाकडं, अशी सत्ताधाऱ्यांची स्थिती आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.





