Maharashtra Congress new president : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर काँग्रेस हायकमांडने हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली.
सपकाळ यांची नियुक्तीनंतरची प्रतिक्रिया समोर आली आहे. नियुक्तीनंतर बोलताना त्यांनी काँग्रेससाठीची राज्यातील भविष्यातील योजना काय असेल, याविषयी माहिती दिली. सपकाळ म्हणाले की, बुथवर चिठ्ठ्या वाटणारा एक कार्यकर्ता पुढे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व त्यानंतर आमदार होतो. त्याला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते व आता प्रदेशाध्यक्ष पदासारखा सन्मान केला जात असेल तर हा भारावून जाण्यासारखा क्षण आहे.‘
एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचा वैचारिक आणि संघटनात्मक विस्तार करण्याचा माझा प्रयत्न असेल. महाराष्ट्रातील सद्भावना कमी झाली असून जाती एकमेकांशी लढत आहेत. प्रत्येक जात वेगळ्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करत आहे.
आज पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आहे की, सर्वांनी एकत्र येऊन काम करावं आणि महाराष्ट्र धर्म जागवावा. सर्वांनी एकत्रित पुढे जावे, या सद्भावाचा अभाव सध्या आपल्याला बघायला मिळतो. ही सद्भावना घेऊन पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, नाना पटोले यांनी मंगळवारी दिल्लीवारीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते. आता सपकाळ हे नाना पटोलेंची जागा घेतील. याशिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची पुन्हा एकदा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.