Maharashtra CM | Devendra Fadnavis : महाराष्ट्राची निवडणूक 20 नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर 23 नोव्हेंबरला जो निकाल लागला त्यात महायुतीला महाप्रचंड यश मिळालं आहे. 237 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. दरम्यान, त्यानंतर आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील. देवेंद्र फडणवीस हेच तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेणार आहेत. पूर्वी 2014 ते 2019 असा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. नंतर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर ते दिड दिवसांचे मुख्यमंत्री झालेले. मात्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळणार तुम्हाला माहित आहे का? नसेल माहिती तर आज आपण यावर एक नजर टाकुयात… महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पगार हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या पगारापेक्षा अधिक आहे. दरडोई उत्पन्नानुसार महाराष्ट्र हे राज्यातील सर्वात श्रीमंत राज्य असल्याने तसेच अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे उद्योग आणि इतर आर्थिक बाबतीतही महाराष्ट्र अनेक राज्यांपेक्षा पुढे असल्याने सहाजिक मुख्यमंतत्र्यांच्या पगाराच्या बाबतीतही असेच चित्र दिसते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दर महिना 3 लाख 40 हजार रुपये वेतन मिळतं. याचप्रमाणे वेगवेगळे भत्ते आणि खर्चासाठीही रक्कम मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेल्या व्यक्तीला दिली जाते. पगारमधूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षाचे 40 लाख 80 हजार रुपये मिळतात. या शिवाय मुख्यमंत्री म्हणून सरकारी निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला, कार आणि नोकरचाकरांच्या माध्यमातून मदतनीसही सरकारच्या माध्यमातूनच पुरवले जातात. अश्या अनेक सुखसोयी मुख्यमंत्र्यांना मिळत असतात.