Maharashtra Cabinet Expansion : आज होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; जाणून घ्या वेळ आणि ठिकाण

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला. यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले. यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
मात्र शपथ घेऊन ८ दिवस झाले तरी मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला होता. अशातच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आज होणार यासंदर्भात शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मंत्रिमंडळ विस्तार होणार, यावर शिक्कामोर्तब केले आहे.
कधी होणार शपथविधी?
नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करणारी एक पत्रिका समोर आली आहे. यामध्ये त्यांनी आजची वेळ ही महाराष्ट्रातील नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राखीव ठेवली आहे. 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता नागपुरातच नव्या सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. येत्या १६ डिसेंबरपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे. त्यापूर्वी संध्याकाळी 4 वाजता नागपुरातील राजभवनावर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
कॅबिनेट मंत्र्यांसाठी बंगले सज्ज
नव्या सरकारमधील कॅबीनेट मंत्र्यांसाठी बंगले सज्ज करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 डिसेंबरला शपथ घेणाऱ्या कॅबीनेट मंत्र्यांसाठी नागपुरात फाईव्हस्टार बंगले सज्ज ठेवेले आहेत. या बंगल्यांमध्ये कार्यालय, दोन बेडरूम, डायनिंग आणि सिटिंग एरिया अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय?
काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजपकडे 18 मंत्रिपदे असणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 12, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार आहेत.





