Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार मोफत धान्य, जाणून घ्या सविस्तर…
Maharashtra Cabinet : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित १४ महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आले आहेत.

Maharashtra Cabinet : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित १४ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा लाभ शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, कामगार, आर्थिक फसवणुकीचे बळी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना होणार आहे. (Maharashtra Cabinet)
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ३३ जिल्ह्यांमधील ४२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर नंदुरबारमधील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet)
मंत्रिमंडळाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय…
१. ४२ लाख शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील आणि डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू, असे एकूण पाच किलो धान्य दिले जाणार आहे. (Maharashtra Cabinet)
२. नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५,५४८ कोटींची तरतूद
नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहा वळण बंधाऱ्यांचे नियोजन असून, सुमारे २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच ११.५० मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. (Maharashtra Cabinet)
३. आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांवर कारवाईला गती
आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रकरणे ९० दिवसांच्या आत निकाली काढण्याची कालमर्यादा निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet)
४. महसूल न्यायालयीन कामकाजात बदल
महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी ‘महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली’ लागू करण्यात येणार आहे. तसेच प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ ही तरतूद लागू करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet)
५. आरोग्य विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना वाढीव निर्वाह भत्ता
आरोग्य विज्ञानातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने भत्ता मिळणार आहे. भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet)
६. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुविधा
शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरबीआयकडे नोंदणीकृत संस्थांमार्फत या वित्तीय सुविधा दिल्या जाणार आहेत. (Maharashtra Cabinet)
७. मुद्रांक अधिनियमात सुधारणा
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केले जाणार आहे. या सुधारणांमुळे अभिनिर्णय शुल्क आणि अपील शुल्काच्या दरांमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Maharashtra Cabinet)
८. मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन
नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Maharashtra Cabinet)
९. दोन विद्यापीठांच्या अधिनियमांमध्ये सुधारणा
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या संबंधित अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल आणि लेखे यांसंदर्भातील तरतुदींमध्ये एकसमानता आणण्याचा उद्देश आहे. (Maharashtra Cabinet)
१०. खासगी अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र कायदा
खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी सर्वसमावेशक कायदा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ‘महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६’ या विधेयकाच्या प्रारूपास मान्यता देण्यात आली असून, ते विधिमंडळात सादर केले जाणार आहे. (Maharashtra Cabinet)
११. माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायद्यांमध्ये सुधारणा
महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ यांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. (Maharashtra Cabinet)
१२. अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीबाबत सुधारणा
राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, २०२१ मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet)
१३. खासगी अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग
शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांप्रमाणेच आता खासगी अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांनाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet)
१४. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात सुधारणा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासंदर्भातील सुधारणा अधिनियम विधिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. या निर्णयांमुळे राज्यातील विविध घटकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून, संबंधित विभागांकडून पुढील अंमलबजावणीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. (Maharashtra Cabinet)




