भयानकच! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात विचित्र आजाराची साथ, 3 दिवसात अनेकांना पडले टक्कल

Maharashtra Buldhana Rare Disease: प्रत्येक व्यक्तीच्या सौंदर्यात केसांची खूप महत्त्वाची भूमिका असते, असे म्हटले जाते. केसांमुळे व्यक्ती अधिकच सुंदर दिसते. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती त्यांच्या केसांची विशेष काळजी घेताना दिसते. मात्र, अवघ्या काही दिवसातच तुम्हाला टक्कल पडले तर? अनेकांसाठी हा मोठा धक्का असेल. अशीच काहीशी विचित्र घटना बुलढाण्यातील एका गावात घडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये हा केस गळतीचा प्रकार समोर आला आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांमधील अनेक नागरिकांचे अवघ्या आठवड्याभरात टक्कल पडले. या घटनेनंतर आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. अचानक केस गळती सुरू झाल्याने आजुबाजूच्या गावातील नागरिक घाबरले आहेत.
अवघ्या 3 दिवसामध्ये 60 पेक्षा अधिक नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. या नागरिकांमध्ये लहान मुले, वृद्ध महिला पुरुष, तरूण-तरूणी सर्वांचचा समावेश आहे. मात्र, केसगळती व टक्कल पडण्याचे नक्की कारण काय, हे अद्याप समोर आलेले नाही. कोणत्या आजारामुळे असे घडले की काही संसर्ग झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आरोग्य विभागाने या गावांचे सर्वेक्षण देखील केले आहे. तसेच, यामागचे कारण जाणून घेण्यासाठी त्या भागातील पाण्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
नागरिक केस गळती सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी यामागे शॅम्पूचा वापर असण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, टक्कल पडलेल्या लोकांमध्ये असेही काहीजण होते, ज्यांनी शॅम्पूचा कधीही वापर केलेला नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.





