Maharashtra Budget Session | Ajit Pawar | Petrol Diesel Price : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सरकारने राज्यासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बजेटमधून काही महत्वाच्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी अजित पवारांकडून पेट्रोल आणि डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे. काय म्हणाले अजित पवार…. “२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा सुधारित कर अंदाज ३,२६,३९७ कोटी आहे. या आर्थिक वर्षाच्या महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दीष्ट ३,४३,०४० कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग केंद्रांना दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल-डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे”, असं अजित पवार म्हणाले.