लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणारी रक्कम वाढणार? आज अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारद्वारे राबवली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहेत. या योजनेतील अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र, सरकारकडून महिलांना 2100 रुपये दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे योजनेंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे.
सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात या योजनेंतर्गत दरमहा दिली जाणारी 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपये केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली जाऊ शकते.
अर्थसंकल्पात याबाबत घोषणा झाल्यास महिलांना एप्रिल महिन्यापासून 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्तमंत्री याबाबतची घोषणा करणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा फायदा मिळत आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वीच खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर मार्चचा हप्ता येत्या बुधवारपर्यंत (12 मार्च) महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.





