Maharashtra Budget 2026 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली असून या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ही कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित कर्जाला लाभ सरकारच्या घोषणेनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतमजुरांनाही अपघात विम्याचा लाभ सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रसंगी शेतमजुरांनाही आर्थिक संरक्षण मिळणार आहे. कृषी जीडीपी वाढवण्याचे मोठे लक्ष्य राज्य सरकारने कृषी क्षेत्रासाठी मोठे लक्ष्य निश्चित केले आहे. २०४७ पर्यंत राज्याचा कृषी जीडीपी ५५ अब्ज डॉलरवरून ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी १० ते १५ प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचेही सांगण्यात आले. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना सेवा शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि अनुदान सहज मिळावे यासाठी MahaDBT आणि Mahavedh यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे एकात्मिक डिजिटल व्यवस्था उभारण्यावर सरकारचा भर असणार आहे. या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.