पुणे – सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रचा तिसऱ्या तिमाहीतील नफा दुपटीने वाढून 325 कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीत बॅंकेला अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यात यश मिळाले आहे. बरीच थकलेली कर्जे वसूल झाल्यामुळे बॅंकेचा ताळेबंद सुधारला असल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत महाराष्ट्र बॅंकेला केवळ 154 कोटी रुपयाच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. डिसेंबरअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत बॅंकेचे एकूण उत्पन्न वाढवून 3,893 कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेचे एकूण उत्पन्न 3,582 कोटी रुपये होते, असे बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बॅंकेला व्याजातून मिळालेल्या उत्पन्नात 17 टक्क्यांची वाढ होऊन हे उत्पन्न 1,527 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत व्याजातून बॅंकेला केवळ 1,306 कोटी रुपये मिळाले होते. खराब कर्जाची वसुली वाढल्यामुळे बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता तिसऱ्या तिमाहीत कमी होऊन 4.73 टक्के म्हणजे 6,104 कोटी रुपये इतकी झाली आहे.
गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता 7.69 टक्के म्हणजे 8,072 कोटी रुपये इतकी होती. निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 1.24 टक्के म्हणजे 1,545 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 2.59 टक्के म्हणजे 2,579 कोटी रुपये इतकी होती. मात्र या तिमाहीत बॅंकेला करासाठी 762 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 502 कोटी रुपये होती. बॅंकेचे कामकाज वेगाने पूर्वपदावर येत असून आगामी काळातील ताळेबंद आणखी चमकदार होण्याची शक्यता बॅंकेला वाटते.