Maharashtra Assembly Winter Session : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरु

Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नागपुरात उद्या, सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरकर असल्याने त्यांच्याकडूनच राज्यातील लोकप्रतिनिधींचे स्वागत असेल. पुढील पाच वर्षांसाठी या अधिवेशनातून विकासाच्या नियोजनाचा रोडमॅप तयार होईल, असे मानले जात आहे.
हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याने राज्यभरातून पाहुणेही शहरात आले आहेत. पुढील सहा दिवस शहरभर राजकीय वर्दळीची रेलचेल असेल. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचे नियमित होणारे हे पहिलेच अधिवेशन असेल. त्यामुळे या पहिल्याच अधिवेशनात राज्यातील विदर्भासह जनतेला सरकारकडून मोठी अपेक्षा आहे.
त्यातही निवडणुकीत मिळालेल्या बंपर यशामुळे सरकार कुठलेही निर्णय घेताना हात आखडता घेणार नाही, अशी जनतेला अपेक्षा आहे. सरकारने लोकहिताचे व विकासाचे मोठे निर्णय घेऊन राज्याच्या प्रगतीचा आलेख वाढवावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे नव्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे फडणवीसांवर केंद्रीत राहणार आहे. निवडणूकपूर्व सत्तेत असताना अनेक मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली होती. त्या योजनेसंदर्भात या अधिवेशनात काही राहणार का, याकडे विशेष नजर असेल.
लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार व इतर अनेक बाबींबर सरकारकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे. विशेष अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणातील गोषवाऱ्यावर सरकारची भूमिका आणि पुढील काळात विभागनिहाय पुरवणी मागण्यांवरील नियोजन कसे असेल, यावरच विकासाचे प्रतिबिंब ठरेल.





