Maharashtra Assembly Election 2024: आम्ही 113 जणांना पाडणार; मनोज जरांगे यांनी उघड केले पत्ते

जालना – मराठा समाज विधानसभा निवडणुकीत 113 जणांना पाडणार आहे. पण त्यांचे नाव घ्यायला ते काय देवदूत आहेत का? मी समाजाला सरळ सांगितले आहे, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीही मराठा समाजाला सन्मान होता. आता विधानसभेलाही मराठा समाजाला सन्मान असणार आहे, असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे यांनी आज आपले पत्ते उघडले आहेत. आतापर्यंत नवीन आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगे यांनी उमेदवार पाडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. ज्यांनी मराठा समाजास त्रास दिला, ज्यांनी मराठा समाजाच्या मुलांकडे पहिले नाही, त्यांना मराठे पाडू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मी वैयक्तिक कोणाला सांगणे म्हणजे समाजाला संकटात आणण्यासारखे आहे. उद्या सत्ता कोणाची येऊ द्या, दोन हात करायची ताकद मराठा समाजामध्ये आहे. आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढणार आहोत. आम्हाला राजकारणाचा नाद लावून घ्यायचा नाही. कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, मराठा समाजाला एकदा आयुष्याचे आरक्षण द्यायचे आहे.
मराठा समाज निवडणुकीमध्ये सक्रीय आहे. त्यांना काय करायचे ते बरोबर कळते. ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करणार आहे. आम्ही सावधच आहोत आणि आमचे आंदोलन सुरू करणार आहोत. आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहेत आणि सहा कोटी मराठ्यांना खेटणे सोपे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.





