‘तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज, पाठीवर हात ठेवून फक्त…’ शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊत झाले भावूक

Maharashtra Assembly Election 2024 । राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरात सुरुवात झाली आहे. त्यातच उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातच बारामती विधानसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार युगेंद्र यादव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या संसदीय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची मोठी घोषणा केली.
यावर आज संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘तुम्ही ठाम उभे रहा आणि पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. आम्ही लढायला तयार आहोत. तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज आहे”, अशी भावूक साद संजय राऊतांनी शरद पवारांना दिली.’
संजय राऊत पुढे म्हणाले,’शरद पवार हे संसदीय राजकारणातील महामेरु आहेत. ते राजकारणातील भीष्म पितामह आहेत. गेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी देशाच्या संसदीय राजकारणात विधानसभा, लोकसभा, विधानपरिषद, राज्यसभा अशा सर्व सभागृहात त्यांनी काम केले आहे. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या इतक्या संसदीय राजकारणाचा अनुभव असणारा नेता देशाच्या राजकारणात नाही.’ असेही राऊत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार
‘विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार बारामती मतदारसंघात सभा घेत आहेत, त्यावेळी बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले होते की, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या’





