Maharashtra Assembly Election 2024 । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (दि. 4) शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसचे बंडखोर राजू लाटकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला नसल्याने मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. आता येथे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्याने पक्षाला धक्का मानला जात आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यात उघड नाराजी पाहायला मिळाली. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 । नेमकं काय म्हणाले संजय राऊत
‘हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. मी स्वतः त्या जागेसाठी बैठकीमध्ये सात दिवस भांडलो आहे. कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेने सात वेळा घेतली आहे. 2019 साली अपघाताने आम्ही हरलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी सांगितलं होतं की पोटनिवडणुकीत आम्ही आपल्याला पाठिंबा देतो. पण, नंतर ही जागा आम्हाला द्या. पण काँग्रेसने ती जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव आहे. आज त्या जागेत गोंधळ निर्माण झाला आहे. पण ती जागा सहा ते सात वेळा शिवसेनेने जिंकली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे खंदे समर्थक आहोत. महाविकास आघाडीला तडा जाईल, असे आम्ही काहीही करणार नाही. ‘