Assembly election: मुंबईत काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमधून 23 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात मुंबईतील काँग्रेसच्या तीन मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यामध्ये सायन कोळीवाडा, कांदिवली पूर्व आणि चारकोप मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली आहे.
या तिन्ही मतदारसंघातून भाजपने उमेदवार दिले आहेत. ज्यामुळे या तिन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेस वि. भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे. पण काँग्रेसने मुंबईतून जाहीर केलेल्या एका मतदारसंघामुळे बंडाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसने मुंबईतील सायन कोळीवाडा या मतदारसंघातून गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपचे कॅप्टन तमील सेल्वन हे विद्यमान आमदार आहेत. महायुतीकडून भाजपने पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी देऊ केली आहे. पण काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर केल्याने याबाबत आता काँग्रेसचे नेते आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रवी राजा यांनी पक्षाकडे या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पक्षाने त्यांना बाजूला ठेवत गणेश यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ज्यामुळे नाराज असलेले रवी राजा यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.





