नेवासा विधानसभा मतदारसंघ: महायुतीकडून विठ्ठलराव लंघे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नेवासा – महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी मंगळवार (दि.२९) रोजी सकाळी ११ वाजता नेवासा शहर भाजपा कार्यालय येथे येवून कार्यकर्त्यांसमवेत मोठे शक्तीप्रदर्शन करत नेवासा तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उमेदवारीसाठी इच्छूक असलेले पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते अब्दुलभैया शेख, माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचे बंधू किसनराव गडाख उर्फ पेशवे, भाजपाचे युवानेते सचिन देसर्डा, माऊली पेचे, शिवसेनेचे बाळासाहेब पवार यांच्यासह महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीकडून राजकीय आखाड्यात शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणाला तिकीट मिळणार ? हा विषय महायुतीतील कार्यकर्त्यांच्या मनात सतत घोळत असतांना स्वतंत्र नेवासा विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा नेमकी भाजपाकडे राहणार की शिवसेनेकडे जाणार? कोण उमेदवार असणार? याबाबत तालुक्यातील जनतेला प्रचंड उत्सुकत्ता लागली होती.
शिवसेनेकडून सोमवारी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या यादीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांचे नांव जाहीर करण्यात आले, महायुतीचा उमेदवार ठरला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला होता. सेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या समवेत महायुती आणि मित्र पक्षातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.
दरम्यान, नेवासा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे शंकरराव गडाख विरुद्ध विठ्ठलराव लंघे-पाटील असा थेट सामना पहायला मिळणार आहे.
दैनिक प्रभातचा अंदाज खरा ठरला –
स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात असून लंघे यांना ही उमेदवारी भाजपाकडून नाहीतर चक्क शिवसेनेकडून मिळणार असल्याचे रोखठोक वास्तव राजकीय अंदाज दैनिक प्रभात’ने सोमवार (दि.२८) रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर शिवसेनेने रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान प्रसिद्ध केलेल्या शिवसेनेच्या यादीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांचे नांव शिवसेनेकडून उमेदवारीसाठी जाहीर केले. दैनिक प्रभात’ने मांडलेला राजकीय अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला.





