भाजपचे तिसऱ्या यादीमध्ये ‘धक्कातंत्र’; 3 विद्यमान आमदारांचे तिकिट कापले

मुंबई – राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 25 जणांची नावे आहेत. भाजपने या यादीमध्ये धक्कातंत्राचा वापर केला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या यादीवर छाप असल्याचे मानले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहायक समित वानखेडे यांना आर्वी मतदार संघातून संधी देण्यात आली आहे. तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांच्यासमोर भाजपने कडवे आव्हान उभे केले आहे. लातूरमधून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीमध्ये तीन विद्यमान आमदारांची तिकिट कापल्याचे दिसून येत आहे. त्यात आर्णीतून संदीप दुर्वै यांच्याऐवजी राजू तोडसाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मध्यमधून विकास कुंभारे यांच्याऐवजी प्रवीण दटके, यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आर्वीतून दादाराव केचे यांच्याऐवजी सुमीत वानखेडे यांना तिकीट देण्यात आले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. #maharashtraassemblyelection2024 pic.twitter.com/flieorhVuh
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 28, 2024
वर्सोवातून पुन्हा एकदा भारती लव्हेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जरगेवार यांनी एकच दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय तिसऱ्या यादीत आमदार राम सातपुते यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने माळशिरस विधानसभामधून पून्हा एकदा राम सातपुतेंनाच संधी दिली आहे. शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांसोबत त्यांची लढत होणार आहे.
पहिल्या यादीत 99 आणि दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा केली होती. आता आणखी 25 उमेदवारांची घोषणा केल्यानं राज्यात भाजपा लढवत असलेल्या एकूण जागांची संख्या 146 झाली आहे.
महायुतीतही मैत्रीपूर्ण लढत?
मोर्शी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपानेही या मतदारसंघातून उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे महायुतीमध्येही जागावाटपाचा घोळ असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या मतदारसंघातून कोण माघार घेणार की मैत्रीपूर्ण लढत होणार याकडे लक्ष वेधले आहे.





