Arvind Singh Mewar : महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे निधन

मेवाड : मेवाडच्या राजघराण्यातील सदस्य आणि महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंग मेवाड (८१) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांनी शंभू निवास येथे अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. उदयपूर येथील त्यांच्या निवासस्थानी मेवाड यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती अरविंद सिंह मेवाड यांचे पुत्र लक्ष्मीराज सिंह मेवाड यांनी दिली. अंत्यसंस्काराला देश-विदेशातील महत्त्वाचे लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या निधनामुळे उदयपूरमध्ये शोककळा पसरली आहे.
अरविंद सिंग मेवाड हे भगवंतसिंह मेवाड आणि सुशीलाकुमारी यांचे पुत्र होते. त्यांचे मोठे भाऊ महेंद्रसिंह यांचे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निधन झाले. लक्ष्यराजसिंह मेवाड यांनी रविवारी इंस्टाग्राम हँडलद्वारे ‘एकलिंग दिवाण’ यांच्या शेवटच्या दर्शनाची आणि प्रवासाची माहिती दिली. त्यांनी लिहिले, मला अत्यंत दुःखाने कळवावे लागत आहे की, माझे वडील अरविंदसिंह मेवाड यांचे रामशरण चैत्र कृष्ण द्वितीये, १६ मार्च २०२५ रोजी निधन झाले. शेवटचे दर्शन १७ मार्च (सोमवार) सकाळी ७ वाजता करता येईल.
अंतिम यात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता शंभू निवास येथून सुरू होईल आणि महासत्यानसाठी रवाना होईल. अरविंद सिंह मेवाड यांच्या निधनाबद्दल अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांनी म्हटले आहे की, मेवाड राजघराण्याचे सदस्य अरविंदसिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे वंशज म्हणून त्यांनी मेवाडची गौरवशाली परंपरा पुढे नेली. त्यांचे योगदान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व नेहमीच लक्षात ठेवले जाईल. भाजप नेते राजेंद्र राठोड यांनी म्हटले आहे की, मेवाड यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांचे निधन केवळ मेवाडसाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी मोठे नुकसान आहे. राजेंद्र राठोड यांच्या व्यतिरिक्त अनेक नेत्यांनी मेवाड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.





