पुणे जिल्हा | मंचर येथील श्री.दाधरादेवी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना महाप्रसाद

मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता.आंबेगाव) येथील श्री.दाधरादेवी प्रतिष्ठानच्या वतीने मंचर परिसरातील तेरा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षारंभ निमित्ताने स्वादिष्ट लापशी, रुचकर मसालेभात अन चवदार शाकभाजीचा महाप्रसाद देण्यात आला. जिल्हा परिषद शाळांतील जवळपास १५१० विद्यार्थ्यांना यानिमित्ताने मेजवानी मिळाली.
संभाजी चौक, मंचर येथील श्री. दाधरादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुश कोटकर, सचिव शेखर बाणखेले आणि सामाजिक कार्यकर्ते पप्पूशेठ थोरात यांचे मार्गदर्शनाखाली शाळा प्रवेशोत्सव प्रथमदिनी मिष्टान्न भोजन वाटपाचे हे नववे वर्ष आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , मंचर क्र.१ (२५०) , मंचर क्र.२ उर्दू शाळा (७५) , मोरडेवाडी (५५०) , लोंढेमळा (१८०) ,
मुळेवाडी (७५) , शेवाळवाडी (५५) , मणिपूर (५०) , निघोटवाडी (७०) , लांडकमाळ (६०) , भेकेमळा (२०) , दस्तुरवाडी (३०) , शिंदेवाडी (२५) , एकलहरे (४५) या शाळांतील १५१० विद्यार्थ्यांना महाप्रसाद वितरित करण्यात आला. मंचर येथील शाळेतच १०० किलो लापशी, १०० किलो मसालेभात व ६० किलो शाकभाजी बनवून संदर्भीय शाळांना नऊ ते दहा या वेळेत वाटप करण्यात आले.
शाळा प्रवेशोत्सव २०२४ निमित्ताने विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे सौजन्य देणाऱ्या श्री दाधरादेवी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठान व सानेगुरुजी कथामाला द्वारे शाल, टोपी अन पुस्तक देऊन मुख्याध्यापिका शैला निमसे, आदर्श शिक्षक चांगदेव पडवळ, विनोद ढोबळे यांचे हस्ते गौरविण्यात आले. सानेगुरुजी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे गुरुजी यांनी प्रास्ताविक करत आभार मानले.





