महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, पंतप्रधान मोदींचा योगी आदित्यनाथ यांना फोन; त्वरित मदत करण्याचे निर्देश

Mahakumbh Mela Stampede: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत जवळपास 17 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
या संदर्भात पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसेच, तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले. एका तासात पंतप्रधान मोदींनी दोनदा योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला. याशिवाय, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आहे.
#MahaKumbh2025 | PM Modi spoke to UP CM Yogi Adityanath about the situation at the Maha Kumbh Mela, reviewed the developments, and called for immediate support measures. pic.twitter.com/T5mQCQM7M0
— ANI (@ANI) January 29, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांना दिले.
दरम्यान, मौनी अमावस्येनिमित्त त्रिवेणी संगमावर शाही स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. गर्दी एवढी प्रचंड वाढली की त्यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. मौनी अमावस्येसाठी मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री अंघोळ सुरू झाल्यानंतर संगमावर गर्दी वाढली. रात्री 2 वाजताच्या सुमारास ही चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे सांगितले जाते.
या घटनेनंतर 13 आखाड्यांनी शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संगम तीरावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितले.





