महायुतीतच ‘महाभारत’! भाजप-अजितदादा गट आमनेसामने, १७ लाख मतदार कोणाला देणार कौल?

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रभागानुसार फोडण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. शहरातील चार विधानसभा मतदारसंघातील १७ लाख १३ हजार ८९१ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यांनी केलेल्या मतदानावरच शहराची सत्ता कोणाच्या हाती जाणार याचा निर्णय होणार आहे. महापालिकेचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार हे मतदार ठरविणार आहेत.
जनगणना झाली नसल्याने या निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार प्रभागांची रचना करण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षांत शहराची लोकसंख्या वाढली असून ती ३० लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थापना ११ ऑक्टोबर १९८२ ला झाली. त्यानंतर २६ मार्च १९८६ पर्यंत पालिकेवर प्रशासक होते.
२ मार्च १९८६ साली ६० वॉर्डसाठी पालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर १९९२ व ९७ ला एक वॉर्ड याप्रमाणे निवडणूक झाली. फेब्रुवारी २००२ मध्ये ३ सदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्या यावेळी ३५ प्रभाग होते. त्यानंतर दोन व चार सदस्य पद्धतीने निवडणुका झाल्या. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २०२१ ची जनगणना झाली नाही. सन २०११ साली शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ३५९ होती.
त्यामध्ये पुरुष ९ लाख ४५ हजार ९४३ व महिलांची संख्या ७ लाख ८३ हजार ४०६ होती. गेल्या पंधरा वर्षात ही लोकसंख्या सुमारे १५ लाखांने वाढून ३२ लाखांच्या जवळ गेली आहे. करोनामुळे २०२१ ची जनगणना झाली नाही, त्यामुळे २०११ च्या जनगणनेनुसारच प्रभागांची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभागाची संख्या ३२ असून, नगरसेवकांची संख्या १२८ असणार आहे.
शहरातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश पिंपरी चिंचवड महापालिकेत होतो. त्यामध्ये भोर विधानसभा मतदारसंघातील सर्वात कमी १३ हजार २९० मतदार आहेत. तर चिंचवडमध्ये ६ लाख ७६ हजार ६३८, पिंपरी ३ लाख ९९ हजार ८११ व भोसरी विधानसभा मतदारसंघातील ६ लाख २४ हजार १५२ मतदारांचा समावेश आहे.निवडणुकीसाठी महायुतीतील पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर महाविकास आघाडीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. शहराची सत्ता कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय शहरातील १७ लाख मतदार घेणार आहेत.
मतदारांच्या संख्येत पाच लाखांने वाढ..
गेल्या पावणेनऊ वर्षांत शहरात ५ लाख २१ हजार ८०२ इतकी मतदार संख्या वाढली आहे. सध्याची शहराची एकूण मतदार संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी आहे. फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीतील मतदार संख्या ११ लाख ९२ हजार ८९ इतकी होती.
“राज्य निवडणूक आयोगाकडून शहरातील विधानसभानिहाय मतदार यादी उपलब्ध झाली आहे. एकूण ३२ प्रभाग निहाय मतदार याद्या फोडण्याचे काम वेगात सुरू आहे. मुदतीमध्ये यादी तयार करण्याचे काम ५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना घेण्यात येतील.”
– सचिन पवार, उपायुक्त. निवडणूक विभाग.





