महाबळेश्वर… भिजरे… हसरे…

– श्रीनिवास वारुंजीकर
वर्ष 2019 मध्ये जागतिक हवामान संघटनांनी जाहीर केल्यानुसार, जगातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले गाव हे मेघालयमधील चेरापुंजी राहिलेले नसून, ते महाराष्ट्रातील महाबळेश्वर आहे. मागील 100 वर्षांचे पर्जन्यमान आणि गेल्या दोन दशकांत वाढलेले पर्जन्यमान पाहता संपूर्ण भारताचीच नव्हे तर जगाची “पर्जन्य राजधानी अर्थात रेन कॅपिटाल’ म्हणून महाबळेश्वरचे स्थान आता अबाधित असे झाले आहे. या महाबळेश्वरविषयी… विशेषत: पावसातल्या महाबळेश्वरविषयी हे लेखन…

आम्ही शाळेमध्ये असताना आठवीच्या मराठीच्या पुस्तकात विख्यात लेखक श्री. म. माटे यांचा धडा (ललित लेख) होता “महाबळेश्वर… भिजरे…हसरे…’ आज महाबळेश्वरविषयी काहीही लिहिताना मला हा धडा अवश्य आठवतो, त्याचे कारण त्या धड्यातील महाबळेश्वरचे वर्णन वाचून अनेकदा महाबळेश्वरला जायचा मोह व्हायचा. तसे सातारा शहरापासून महाबळेश्वर गदीच जवळ म्हणजे अवघे 50 किमी अंतरावरच. पण त्यावेळी आजच्या इतक्या प्रवासाच्या सहजसोप्या सुविधा नव्हत्या आणि एकट्याने किंवा धाडस करुन मित्रांबरोबर जाणे शक्य नसायचे.
मात्र, जसे महाविद्यालयीन जीवन सुरु झाले, तशा महाबळेश्वरच्या खेपा वाढू लागल्या. अगदी सुरुवातीला तर मला महाबळेश्वर नक्की किती मोठे आहे, हे समजायचेच नाही. म्हणजे मुख्य गाव मुठीएवढ्या घरांचे आणि मग दूरदूर जंगलातून जात असलेल्या अरुंद वाटा आणि शेवटाला महाकाय दरीचे दर्शन देणारा एखादा पॉईंट. त्यातच वेण्णा लेक, तिथले मंतरलेले वातावरण आणि डॉ. साबणे रोडवरचे “पक्षीनिरीक्षण करत’ केलेले शॉपिंग एवढेच कळायचे.
मात्र, जसजशा महाबळेश्वरच्या खेपा वाढायला लागल्या तसतसा मी या महाबळेश्वरच्या प्रेमातच पडू लागलो. सुरुवातीची काही वर्षे, म्हणजे महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतरची वर्षे मी औषध वितरण क्षेत्रात काढल्याने महाबळेश्वर माझ्या कार्यक्षेत्रात येत होतेच. शिवाय महाविद्यालयीन जीवनापासून पर्यावरण क्षेत्रात काम करत असल्याने अपरिहार्यपणे महाबळेश्वरला जाणे व्हायचेच. आमच्या जिओसॉफ्ट नेचर क्लबच्या निसर्ग शिक्षण शिबिरातून महाबळेश्वरचे अंतरंग हळुहळू उलगडत गेले आणि मग समजले की, आपण वरवर पहातो, त्यापेक्षा या “क्वीन ऑफ हिलस्टेशन’ची मजा काही निराळीच आहे.
त्याआधी महाबळेश्वरची आणखी रुपे मनात साठवता आली. मग पश्चिम घाट वाचवा योजनेतल्या सहभागाची संधी असो, की कुणा पाहुण्यांना महाबळेश्वर दाखवण्याची संधी असो, महाबळेश्वर मला आणखीनच उलगडत गेले. या दरम्यान महसूल विभागाचा “चॅपलीन बंगला’ असो की वाठार नाक्यावरचे (पाचगणी-मेढा रस्ते एकत्र मिळतात तो चौक) सार्वजनिक बांधकाम विभागाचे “वेण्णा दर्शन’ किंवा महाड नाक्यावरचे “गायत्री’-सावित्री’ विश्रामगृह असो, किंवा लिंगमळा धबधब्याजवळचे “लिंगमळा फॉरेस्ट गेस्ट हाऊस’ असो अशा अनेक ठिकाणी अत्यल्प दरात राहण्याचा आनंद घेता आला. वेण्णा लेकजवळच्या प्रतापसिंह उद्यानातील ‘हिरडा’ गेस्ट हाऊसमध्ये रहाण्याचा आनंदही आगळा-वेगळाच असायचा.
त्यानंतर सोलर सिस्टीम्स बसवण्याच्या निमित्ताने महाबळेश्वर-पाचगणीमधल्या अनेक नामांकित हॉटेल्समध्ये रहाण्याची संधी मिळत गेली आणि ज्या उंची महागड्या हॉटेलात फिल्मस्टार्स रहातात, अशा हॉटेलल्सची सगळीकडची शाही सरबराई अतिशय संस्मरणीय.

शिवाय वेगवेगळ्या निमित्ताने मुसळधार पावसात भिजायला टुव्हीलरवरुन महाबळेश्वरचा आनंद असा काही घेतला आहे की, कोणत्याही शहरातला पाऊस मला भातुकलीचा पाऊसच वाटत रहातो. मग मित्र-मैत्रीणींसमवेत केलेल्या महाबळेश्वरच्या सहली आणि माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी चार मित्रांसह केलेल्या महाबळेश्वरच्या ट्रीप्स म्हणजे मुक्कामी महाबळेश्वरच्या संस्मरणीय दिवसांची आठवण… तर आज आपण वाचणार आहोत, मुसळधार पावसातल्या हसतमुख आणि ओलेत्या महाबळेश्वरविषयी.
सहसा तुम्ही करता काय, तर महाबळेश्वरला जायचे म्हणजे बॉम्बे पॉईंटवरुन सूर्यास्त पहायचा, केट्स पॉईंटवरुन धोम धरणामागील कृष्णा नदीचे पात्र पहायचे, मग ऑर्थर सीट पॉईंटच्या रौद्र भीषण सह्याद्रीचे कडे आणि तितकीच भीषण दरी पहायची, वेण्णा लेकमध्ये बोटींग किंवा हॉर्स रायडींग करायचे आणि संध्याकाळी मार्केटमध्ये शॉपिंग करायचे. माझ्या महाबळेश्वरच्या भेटीत ही ठिकाणे सोडून अन्य 40-45 ठिकाणांचा समावेश नक्की असायचा. “न पाहिलेले महाबळेश्वर’ या संकल्पनेत माझ्या मनातले महाबळेश्वर निराळेच असायचे आणि आहेही…
चला तर मग सातारा शहरातून मेढामार्गे केळघरच्या घाटातून महाबळेश्वरकडे जाऊया… पावसाळा सुरु आहे बरं का… तर केळघरचा घाट सुरु झाला की, लहानमोठे धबधबे आपलं स्वागत करतात. रेंगडी पठार-माचुतर येथून दरीत झेपावणारे तीन-चार मोठे धबधबे काळा कडा (एक धोकादायक वळण) ओलांडल्यानंतर आपले सहर्ष आणि सचैल स्वागत करतात. इथे थांबून फोटो काढल्याशिवाय पुढे जाताच येत नाही आणि हे रस्त्यालगतचे धबधबे इतके सुरक्षित आहेत की, प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या जलधारांशी आपण सहजपणे मस्ती करु शकतो. काळ्या कड्याच्या दरीच्या बाजूने खोल-खोल खेडी दिसत राहतात आणि मधूनच ही संपूर्ण दरी ढगांनी भरुन जाते.
काळा कडा ओलांडून रेंगडीच्या दिशेने आपण निघालो की, एका वळणावर अचानकपणे एक तीन टप्प्यात दरीत उतरणारा विशालकाय धबधबा दिसतो. होय हाच तो लिंगमळा धबधबा, वेण्णा लेकमधून उगम पावलेली वेण्णा नदी दरीत उतरताना निर्माण झालेला हा धबधबा आपल्याला नेत्रसुखद तर दिसतोच, शिवाय घाटात शांतता असेल, विशेष वाहनांचे आवाज नसतील, तर त्याचा कोसळतानाचा धीरगंभीर नादही आपल्या कानावर पडतोच. मधूनच येणारे ढगांचे लोट, त्याआड दडणारा धबधबा आणि मग ढगांच्या धुसर प्रतलातून दिसणारा पाण्याचा प्रवाह मनोहारी दिसतो.
काळा कडा ओलांडून आपण येतो माचुतरमध्ये आणि तिथून लिंगमळा धबधबा, माचुतर गाव, महाबळेश्वर रस्ता आणि सातारा रस्ता या चौकात एक चहावाला तुम्हाला देवदूतासारखा भासतो. गवती चहा, आले आणि डार्क पावडर वापरुन केलेला आणि काचेच्या ग्लासातून सर्व्ह केला जाणारा हा चहा ग्लासातून निघणाऱ्या वाफा आसमंतात विहरणाऱ्या धुक्यामध्ये विरघळून जातात, ते पाहण्याचा क्षणही दैवीच म्हणायला हवा.
महाबळेश्वरची खरी नज़ाकत इथूनच सुरु होते. जांभूळ, हिरडा, बेहडा, आंबा, खैर, ऐन, किंजळ, कारंजा अशी सदाबहार (कधीच पानगळ नसलेली) आणि घनदाट झाडे, या झाडांच्या पानापानातून ठिबकणारा मान्सूनच थेंबांश आणि झाडाच्या फाद्यांवर, खोडांवर लपेटलेले गर्द पोपटी रंगाच्या शैवालाची शाल म्हणजे पश्चिम घाटातल्या निसर्गाचं भरभरुन देणंच म्हणायला हवं. हे शैवाल झाडाच्या खोडावरुन खरवडून त्याची मऊशार गादी घरी नेण्याचा मोहही अनेकांना होत असतो. पण निसर्गातल्या अशा गोष्टी जिथल्या तिथेच शोभून दिसतात, हे अशा लोकांना कोण समजावणार?
इथून हिरवा बोगदा अर्थात ग्रीन टनेलमधून पुढं जात लिंगमळा गेस्ट हाऊसच्या दिशेनी जायचं आणि तिथेच कार पार्क करायची. रस्त्यावर मात्र जपून हं, कारण वळणावळाणाच्या अरुंद रस्त्यावर शेजारुन वाहणारे नाले आपलं पाणी घेऊन येतातच; शिवाय काही ठिकाणी डांबराला पडलेल्या भेगांतून शेवाळंही रस्त्यावर अगदी मनमोकळेपणानं विहरलेलं दिसतंच. म्हणून ब्रेक मारताना सावकाश, नाहीतर शक्यतो गिअर कंट्रोलच उत्तम.
एक मोठी विटाविटांची चिमणी बाहेर आलेलं आणि पक्कं ब्रिटीशकालीन गॉथिक आर्किटेक्चर असलेलं लिंगमळ्याचं फॉरेस्टचं गेस्ट हाऊस मनभरुन पाहून घ्यायचं आणि उजवीकडून लाल दगडाच्या पायऱ्या उतरायला सुरुवात करायची. (याच ठिकाणी आम्ही जिओसॉफ्ट नेचर क्लबची निसर्ग शिक्षण शिबिरे घेत होतो आणि सलग तीन-चार दिवस महाबळेश्वरच्या वाटा- आडवाटा तुडवत होतो.) मग उंचच उंच झाडांमधून शांतपणे वाहणारी वेण्णा नदी भेटते आणि तिच्या उजव्या तीरावरुन परत हळूहळू पुढे लाल दगडाच्या वाटेवरुन गेलं की दरीत कोसळणाऱ्या धबधब्याच्या धीरगंभीर नाद छातीत धडकी भरवतो. होय. हाच तो केळघरच्या घाटातून पाहिलेला लिंगमळा धबधबा.
वेण्णा नदीचं अफाट पाणी सह्याद्रीच्या दरीत ओतताना बहुधा त्यालाच मोठा आनंद झालेला दिसतो. तीन टप्प्यात कोसळणारा हा धबधबा पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात खडकावर आदळताना जे तुषार उडवतो, त्याचेच ढगासारखे पुंजके दरीतून येत असलेल्या वाऱ्यामुळे परत वरवर येताना दिसतात. लालबुंद माती, हिरवेगार डोंगर, काळसर किरमिजी आकाश आणि त्यात शुभ्रधवल पाण्याची धार आणि “यु’ आकाराच्या दरीतून विहरणारे ढगांचे पुंजके म्हणजे स्वर्गीय प्रवासाचा आनंदच म्हणायचा.

लिंगमळ्यातून परत येत मेढा रस्त्यावरच्या माचुतरनंतर मनोहारी वळणांचा रस्ता आपल्याला प्रत्यक्ष महाबळेश्वरात घेऊन जातो. मग महाबळेश्वरची हद्द सुरु होताच उजवीकडे तुम्ही थोडेसे वरवर गेलात की, एल्फिन्स्टन पॉईंट दिसतो. इथून खूप खोल दरी दिसत नाही. पण हा महाबळेश्वरमधील सर्वात उंच पॉईंट असून सूर्योदय पहाण्यासाठीचे हे आदर्श ठिकाण असल्याने याला “सनराईज पॉईंट’ असेही म्हणतात. सूर्योदयाचे फोटोग्राफ्स काढण्यासाठी (आणि बहुधा टेहळणीसाठी) येथे काही बुरुजांसारखे बांधकाम केल्याचेही दिसते.
इथून पुढे आल्यावर तुम्ही थेट महाबळेश्वरात प्रवेश करता आणि पावसाळ्यामुळे झापं लावलेली घरं, प्लास्टीक शिट्स लावलेली हॉटेल्स आणि भिजलेले रस्तेच आपलं स्वागत करतात. एवढ्या काळात चहाची, नाही आता कॉफीची तल्लफ आलेलीच असते. मग बाबा इराणीच्या जुन्या इंपिरियल स्टोअर्सच्या बाल्कनीत बसून वाफाळत्या नेस्कॅफेचे घोट घेणे म्हणजे आनंदाची परमावधीच म्हणायला हवी.
किल्ल्यासारखे बांधकाम केलेल्या भागातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, वाऱ्यावर डोलणारे भगवे झेंडे आणि आजूबाजूला बसलेले किरकोळ विक्रेते म्हणजे महाबळेश्वरचा हॉटेल आराम चौक. इथून तापोळ्याकडे एक रस्ता जातो, ज्याच्या वळणावर वन खात्याचे कार्यालय आहे; शिवाय महाबळेश्वरची खासियत असलेल्या मामा चनावाल्याच्या भट्टया येथे आहेत. इथला उबदार धूर आणि फुटाण्याचा खमंग वास तुमच्या गॅस्ट्रीक सेन्सेसला आव्हान देतोच. शिवाय पाऊस उघडला असेल, तर चक्क मेन रोडवरुन अर्थात डॉ. साबणे रस्त्यावरुन ढगांचे पुंजकेही मॉर्निंग वॉक करताना दिसतात.
आता थोडंसं बाहेर पडून आपण बसस्टॅंडला वळसा घालून महाड रस्त्याकडे जायला निघायचं. थोडंसं पुढे आल्यावर महाबळेश्वर मधोत्पादक सोसायटीच्या पार्कींगमध्ये कार पार्क करायची आणि चालत सुटायचं. हॉटेल ग्रीन लॅंडकडे जाणारा रस्ता पकडायचा. मग आपल्याला दिसतो तो “टायगर पाथ…’ घाबरु नका; टायगर नसतो इथे आता, पण ज्याला महाबळेश्वरचं अस्सल रेनफॉरेस्ट बघायचं आहे, त्यानं लिंगमळा धबधबा आणि टायगर पाथ कधीही मिस करु नये.
तर टायगर पाथ…माझं महाबळेश्वरमधलं सर्वात आवडतं ठिकाण… ठिकाण म्हणजे रस्ता. खरंतर ही एक मोठीशी पायवाटच आहे. घनदाट झाडीतून जाणारा रस्ता अशी काही वळणे घेतो की, अचंबित व्हावे. दिवसा सूर्यकिरणेही झाडांनी परवानगी दिल्याशिवाय जमिनीवर उतरणार नाहीत, असा दिवसा काळेखाचा अनुभव देणारा हा रस्ता. जाडजाड वेली आणि उचंच उंच झाडांनी व्यापलेल्या या सुमारे तीन किलोमीटरच्या वाटेवर पक्ष्यांचा मंजूळ स्वर नक्कीच कानी पडतो. आपण हरवूनच जातो त्या वातावरणात… हिरवी झाडी, निळी धुक्याची भूल आणि लालसर तांबडी वाट म्हणजे एखाद्या हॉरर सिनेमातील हॉंटींग पायवाट…
आपण आपल्यातच मग्न होत चालू लागतो आणि मग ओलसर पाचोळा वाजला तरी तंद्री भंग पावत नाही. झाडांच्या गगनचुंबी फांद्या न्याहाळतानाच अचानकपणे खसफस ऐकू येते आणि शेकरु अर्थात जायंट स्क्वीरल आपल्याला दर्शन देते. तिचे अतिशय मोहक केशरी-तपकिरी झुपकेदार शेपूट आपण आयुष्यात कधीच पाहिलेले नसल्याने आपल्याला मोहूनच टाकते. या टायगर पाथवर आणि लिंगमळा गेस्ट हाऊसच्या परिसरात मला स्वत:ला इतक्या वेळा शेकरु दिसला आहे की, एखाद्यावेळेस नाही दिसला तरच चुकल्यासारखे वाटेल.
तर आपण चालत आहोत ते टायगर पाथवर… चालायला सुरुवात केल्यापासून एक मनमोहक वळण येते, जिथे एक विहीर आहे. या वळणावर झाडी एवढी घनदाट आहे की, झाडांच्या बुंध्यांनी ऑक्सिजनच्या शोधात घेतलेली वळणे पाहिली की थकायला होते. एक झाड तर चक्क इंग्लिश एस आकाराची फांदी घेऊन उभं आहे, असं दिसतं तो फोटो अवश्य निरखून पहा म्हणजे या झाडाचं सौंदर्य तुम्हाला उलगडेल. अगदी याच वळणावर दुसरीकडे तुम्हाला बांबूची उंचच उंच स्टेम्स दिसतील, ज्याला आमच्या सातारी गावठी भाषेत “कळकीची बेटं’ म्हणतात.
हा टायगर पाथ मधोत्पादक सोसायटीकडून सुरु होतो आणि पुढे संपतो ते ठिकाण म्हणजे बॉम्बे पॉईंट… महाबळेश्वरचा सूर्यास्तबिंदू. पण आपल्याला बॉम्बे पॉईंटविषयी इथं बोलायचं नाहीये, तर न पाहिलेल्या महाबळेश्वरविषयी बोलायचं आहे.
आता आपल्याला जायचंय इथून जवळच… लॉडविक पॉईंट जवळ… महाबळेश्वर-महाड रस्ता पकडायचा आणि टायगर पाथकडे पाठ करुन लॉडविक पॉईंटच्या दिशेने जायचे. लॉडविक पॉईंटजवळच्या पार्किंगमध्ये कार पार्क करायची आणि प्रत्यक्ष लॉडविक पॉईंटकडे न जाता हळूच जंगलात शिरणारी चोरवाट पकडायची जिचं नाव आहे “लॉडविक ट्रेल…’ किंवा “हेलन्स पॉईंट’!
एकीकडे महाडच्या दिशेने खोलखोल उतरत जाणारा आंबेनळी घाट, त्यातून घरंगळत जाणारी वाहने, उजवीकडे लॉडविक पॉईंटचे नाक, तेथील दगडी स्तंभ अर्थात पिटर लॉडविकचे मेमोरियल, समोर सह्याद्री पर्वतरांगेतला एककाळचा ऐतिहासिक शिवकालीन दुर्ग प्रतापगड-आडवातिडवा पसरलेला कडा, त्याच्याही पलिकडे दिसणारी पोलादपूर-खेड या मुंबई-गोवा रस्त्यावरील कशेडी घाटाची रेघ आणि साथीला घनगर्द झाडी… निळ्या रंगाची व्हॅली… स्वर्ग स्वर्ग म्हणतात, तो हाच बरं. मधूनच आकाशात झेपावणारे गरूडही तुम्हाला इथे सहज दिसतील. त्यांची घरटी याच कडेकपारीमध्ये दडलेली आहेत.
आता मला सांगा, वाळवंटात तग धरणारी सर्वात महत्त्वाची हिरवी वनस्पती म्हणजे निवडुंग अर्थात कॅक्टस. बरोबर? वाळूच्या सान्निध्यात आणि पाण्याच्या अभावात फोफावणारे कॅक्टस आपण अनेकदा पाहिले असतील. पण कुणी असा विचार कधी केलाय का की, जर कॅक्ट्सला भरपूर पाणी घातलं तर काय होतं? कुणी म्हणेल कॅक्टस मरून जाईल. नाही!!! त्यासाठी महाबळेश्वरला जायलाच हवं. तर एसटी बस स्टॅंडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शासकीय दूध डेअरीला आपण अवश्य भेट दिली पाहिजे;
इथे मी तुम्हाला दाखवेन आशिया खंडातला सर्वात उंच कॅक्टस, ज्याचं नाव आहे नोटोकॅक्ट्स!! तीन मजली उंचीच्या इमारतीच्या वरपर्यंत पोहोचलेला हा कॅक्ट्स महाबळेश्वरचा अमर्याद पाऊस पिऊन इतका माजला आहे की, त्याला सपोर्ट करण्यासाठी थोडंसं फॅब्रिकेशन स्ट्रक्चर उभं करण्यात आलं आहे. या कॅक्टसची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्येही झाली आहे, मात्र त्यापेक्षाही हा माजलेला कॅक्ट्स प्रत्यक्षात पाहण्यात जी मौज आहे, ती शब्दात मांडता येणार नाही, हे नक्की.
याशिवाय वेण्णा लेक आणि तापोळा रस्त्यावरील wheat-rust संशोधन केंद्र असो की मोरारजी हॉस्पिटलच्या आवारात नव्याने उभारलेलं भारतातलं एकमेव ढग संशोधन केंद्र असो, महाबळेश्वरच्या पावसाचं आणि आपल्या मनातल्या पावसाचं नातं सदासतेज रहातं आणि ते कवितेच्या माध्यमातून अपारपणे जपलं जातं, हे किती तरी मोलाचं आहे.
शेवटी अरुणा ढेरे म्हणतात त्याप्रमाणे…
पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो
खोवून पीस मोराचे कान्हा होतो
पाऊस सोलतो हृदय; कापतो नाती
घनव्याकूळ करतो एकांताच्या राती…
असा घनव्याकूळ करणारा पाऊस अनुभवायचा असेल तर महाबळेश्वरला पर्याय नाही, हे नक्की.
– श्रीनिवास वारुंजीकर
















